मूल होत नव्हतं; आधी तांत्रिकाकडे नेलं, नंतर पुरुषांशी संबंध ठेवण्यास भाग पाडलं, तरीही पत्नी गरोदर न राहिल्यानं पतीनं नको ते केलं
esakal June 04, 2025 09:45 PM

उत्तर प्रदेशातील बरेली येथील मिरगंज येथील एका महिलेने तिच्या सासरच्या लोकांवर गंभीर आरोप केले आहेत. तिने सांगितले की, दीड वर्ष मूल न झाल्याने तिचा पती तिला एका तांत्रिकाकडे घेऊन गेला. तिला नशेचे औषध दिले आणि नंतर तिला दोन लोकांच्या स्वाधीन केले ज्यांनी तिच्यावर बलात्कार केला. जेव्हा महिलेने शुद्धीवर येऊन विरोध केला तेव्हा तिला मारहाण करून घराबाहेर हाकलून देण्यात आले. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला मूळची पिलीभीतमधील एका गावातील आहे. जून २०२३ मध्ये तिचे लग्न बरेलीच्या मिरगंज पोलीस स्टेशन परिसरातील एका गावातील एका तरुणाशी झाले. लग्नानंतर सुरुवातीला सर्व काही व्यवस्थित चालले. परंतु जसजसा वेळ गेला आणि तिला मुले झाली नाहीत तसतसे पती आणि त्याच्या कुटुंबाचे वर्तन बदलू लागले. दीड वर्ष मूल न झाल्याने पतीने तिच्यावर अत्याचार करण्यास सुरुवात केली. तिला दररोज मारहाण करण्यास सुरुवात केली, असा महिलेचा आरोप आहे.

इतकेच नाही तर पतीने तिच्या संमतीशिवाय अनेक वेळा तिच्याशी लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोपही महिलेने केला आहे. महिलेने आरोप केला आहे की, १२ एप्रिल २०२५ रोजी तिचा नवरा तिला मीरगंज परिसरातील असद नगर राहणाऱ्या एका तांत्रिक गिरधारीकडे घेऊन गेला. पतीने तिला सांगितले की, तांत्रिक काही तंत्र-मंत्र करेल, ज्यामुळे मूल होण्यास मदत होईल. पण जेव्हा ती तिथे पोहोचली तेव्हा तांत्रिकाने सांगितले की, मूल होण्यासाठी तिला दुसऱ्या पुरुषाशी संबंध ठेवावे लागतील.

त्यावेळी तिच्या पतीचे काही ओळखीचे लोक तिथे आधीच उपस्थित होते. तांत्रिकाने तिला एक औषध दिले, जे पिऊन ती बेशुद्ध झाली. शुद्धीवर आल्यानंतर तिला कळले की दोन लोकांनी तिच्यावर बलात्कार केला आहे. यानंतर, जेव्हा ती महिला घरी परतली आणि तांत्रिकाच्या घरी घडलेल्या घटनेबद्दल तिच्या सासू आणि वहिनींना सांगितली. तेव्हा त्यांनी तिच्यावर विश्वास ठेवला नाही. महिलेने आरोप केला आहे की, तिच्या सासू आणि वहिनींनी तिला शिवीगाळ केली. मारहाण केली आणि घराबाहेर हाकलून लावले.

त्यानंतर ती महिला तिच्या माहेरी गेली आणि तेथील तिच्या पालकांना संपूर्ण घटना सांगितली. यानंतर तिने मिरगंज पोलीस स्टेशन गाठले आणि या प्रकरणात तक्रार दाखल केली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी तांत्रिक गिरधारीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितले की, तपास सुरू करण्यात आला आहे आणि आरोपींना अटक करण्यासाठी छापे टाकण्यात येत आहेत. पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे आणि तिचा जबाब नोंदवण्यात येत आहे. गुन्हेगारांना सोडले जाणार नाही असे पोलिसांचे म्हणणे आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.