पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या तोंडावर अनके पक्षांनी तयारी सुरू केली आहे. अशामध्ये शिवसेना ठाकरे गटातील अनेकजण नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मुंबई, कोकणनंतर आता पश्चिम महाराष्ट्रात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण, सांगलीतील शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रहार पाटील हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती मंत्री संजय शिरसाट यांनी दिली. तसेच, हा प्रवेश थांबवून दाखवा, असे आव्हानही त्यांनी यावेळी केले. मात्र, आता काही तासांनंतर स्वतः चंद्रहार पाटील यांनी आपली भूमिका सर्वांसमोर मांडली आहे. ते म्हणाले की, मी अधिकृत भूमिका घेतली नसून माझ्या सहकाऱ्यांसोबत बोलून पुढचा निर्णय घेईन, असे म्हटले आहे. (Chandrahar Patil clearifies on entering into मराठी’s Shivsena)
हेही वाचा : Shivsena UBT : संजय राऊतांचा फोन अन् सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी, त्या पत्रकार परिषदेत नेमकं काय घडलं?
डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी ट्विटरवर लिहिले आहे की, “माझ्या पक्षप्रवेशाच्या बाबतीत, मी अधिकृत भूमिका घेतलेली नाही. शिवसेना शिंदे गटाकडून पक्ष प्रवेशाबाबत मला ऑफर आहे. पक्षप्रवेश करायचा, पक्ष सोडायचा याबाबतचा निर्णय अजून घेतलेला नाही, सध्या मी बाहेर गावी असून माझ्या सहकाऱ्यांसोबत बोलून पुढील निर्णय घेईन.” असे म्हणत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. दरम्यान, सांगली लोकसभा निवडणूक लढण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाने अचानक चंद्रहार पाटील यांच्या नावाची घोषणा केली होती. त्यामुळे काँग्रेसकडून इच्छुक असलेल्या विशाल पाटील यांची कोंडी झाली. विशाल पाटील, विश्वजित कदम आणि काँग्रेसच्या नेत्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे चंद्रहार पाटील यांची उमेदवारी मागे घेण्यासाठी विनंती केली होती. पण, खासदार संजय राऊत हे चंद्रहार पाटील यांच्यासाठी आग्रही राहिले आणि विशाल पाटील यांनी महाविकास आघाडीत बंड केले.
डबल महाराष्ट्र केसरी असलेले चंद्रहार पाटील यांनी 26 एप्रिल रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कुडाळ येथे भेट घेतली होती. मंत्री उदय सामंत यांच्या मध्यस्तीने ही भेट झाल्याची चर्चा होती. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेत पाठीमागे उभे असलेल्या चंद्रहार पाटील यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर ते ठाकरेंच्या शिवसेनेला सोडतील हे याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यांनी काही दिवसांपूर्वी उदय सामंत यांची देखील भेट घेतली होती. भेटीनंतर त्यांनी मी पक्षासोबत आहेत, काही कामानिमित्त मी त्यांना भेटलो असल्याचं देखील चंद्रहार पाटील यांनी सांगितले होते.