पुणे : अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार दीपक साळुंके यांच्या मुलीला सासरी छळ केल्याप्रकरणी पुण्यातील (Pune) गणेश गायकवाड, त्याचे वडिल नाना गायकवाड यांच्यासह गायकवाड कुटुंबीयांवर गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी, गणेश गायकवाड आणि नाना गायकवाड सध्या न्यायालयीन कोठडीत असून कुटुंबातील इतर महिला सदस्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान, पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे पुन्हा एकदा गायकवाड प्रकरण समोर आले आहे. कारण, हगवणेंचे मामा विशेष पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर )Jalinder supekar) यांच्याकडून गायकवाड पिता-पुत्राकडे तब्बल 500 कोटींची मागणी करण्यात आल्याचा आरोप गायकवाड यांच्या वकिलांनी केल्यामुळे हे पिता-पुत्र चर्चेत आले आहेत. त्यामुळे, गणेश गायकवाड आणि नाना गायकवाड नेमकं कोण? याची माहिती लेखातून घेता येईल. या दोघांवर एकूण 13 गुन्हे दाखल आहेत.
पुण्यातील सावकार नानासाहेब आणि त्याचा मुलगा गणेश गायकवाड हे सावकार आहेत. दोघेही सूनेचा छळ केल्याच्या आरोपावरुन गेली काही वर्षे तुरुंगात आहेत. कारागृह उपनिरीक्षक असताना जालिदर सुपेकर यांनी या बाप-लेकाकडे 500 कोटी रुपये मागितल्याची तक्रार त्यांनी वकिलांमार्फत न्यायालयात केली होती. मुलगा गणेश गायकवाडचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यानंतर शिवसेनेत गेलेल्या दिपक साळुंखे यांच्या मुलीसोबत म्हणजेच मुक्ता साळुंकेसोबत 2017 मध्ये लग्न झालं होतं. मात्र, मुक्ताचा हुंड्यासाठी छळ होत होता, त्यावरुन 2018 मध्ये गायकवाडांनी छळ केल्याबाबतची पहिली तक्रार दिली होती. त्यानंतर, 2021 मध्ये मुक्ता साळुंकेने पोलिसांकडे पेटवलेल्या सिगारेटचे चटके देऊन मारहाण केल्याची तक्रार केली होती. याप्रकरणी गायकवाड बाप-लेकांना अटक झाली होती.
नाना गायकवाडच्या सावकारीविरुद्ध अनेक जणांनी तक्रारी केल्याने त्याच्यावर मकोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली. नाना गायकवाड आणि गणेश गायकवाड यांच्यावर पोलिसांनी तीन मकोका कारवाई केली आहे. तसेच, येरवडा कारागृहात बंदिस्त असताना त्याच्यावर इतर कैद्यांकडून हल्ला करण्यात आला. त्यामुळे त्यांना आणि गणेशला अमरावती कारागृहात हलवण्यात आले होते.
गायकवाडच्या वकिलाने केलेल्या दाव्यानुसार जालिंदर सुपेकर तुरुंग उपमहानिरिक्षक असताना 19 ऑगस्ट 2023 ला अमरावती कारागृहात आले होते आणि तिथे त्यांनी गायकवाडला 500 कोटी रुपये जामिनासाठी मागितल्याचा आरोप गायकवाडच्या वकिलांनी न्यायालयात दाखल याचिकेत केला आहे. नानासाहेब गायकवाड हे चिंचवडचे भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे सख्खे मावस भाऊ आहेत. गणेश आणि नाना गायकवाड या दोघांवर वेगवेगळ्या प्रकरणात एकूण 13 गुन्हे दाखल आहेत आणि 3 मकोका कारवाई आहेत.
आणखी वाचा