
पुणे महापालिका प्रशासनाने निवडणुकीची तयारी सुरू केली असून, अतिरिक्त आयुक्तांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला. मतदार केंद्र, निवडणूक अधिकारी कार्यालयांसाठी जागा शोधण्यापासून निवडणुकीसाठी लागणाऱ्या मनुष्यबळासाठी शासनाच्या विविध विभागांशी संपर्क साधण्याचे आदेश या अधिकाऱ्यांना दिले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य शासन अथवा राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत अद्याप कुठलेही निर्देश दिलेले नाहीत. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुका घेण्यासंदर्भात दिलेल्या आदेशानुसार पुणे महापालिकेने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. दरम्यान, पुणे महापालिकेने निवडणुकीच्या दृष्टीने यंत्रणा उभी करावी लागल्यास आतापासूनच चाचपणी सुरू केली आहे. यासाठी अतिरिक्त महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेत आवश्यक ती कार्यवाही करण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपेक्षा अधिकची मतदान केंद्रे लागणार आहेत. तसेच निवडणूक अधिकाऱ्यांसाठी अधिकच्या कार्यालयांची गरज भासेल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त दिवटे आणि निवडणूक विभागप्रमुख प्रसाद काटकर यांनी दिली.
समाविष्ट गावांतही सर्व्हेक्षण
महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या 23 गावांत नव्याने मतदान केंद्रे उभारावी लागणार आहेत. याचाही विचार करून आतापासूनच अधिकाऱ्यांना त्यांच्या हद्दीतील मतदान केंद्र व निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयांसाठीच्या जागांचे सर्वेक्षण, तेथे सध्या असलेल्या सुविधा व कराव्या लागणाऱ्या उपाययोजना याची माहिती आतापासूनच गोळा करण्याचे आदेश दिले आहेत.
सेलिब्रिटींच्या नावांचीही होणार तपासणी
मतदार याद्यांमधून वर्षानुवर्षे असलेली सेलिब्रिटींची नावे वगळण्याच्या घटना घडतात. अशा नावांचीदेखील तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. शासकीय कार्यालयांना पत्र पाठवून त्यांच्याकडील मनुष्यबळाची महितीदेखील गोळा करण्यास सांगितल्याचे दिवटे आणि काटकर यांनी नमूद केले.