US runner wins gold after double somersault at finish line : १०० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत असं काही होईल, हे कुणालाच वाटलं नव्हतं. अमेरिकेतील ब्रुकलिन अँडरसन या युवा धावपटूने अविश्वसनीय प्रकारे सुवर्णपदक जिंकलं. फिनिशिंग लाईन पार करण्यापूर्वी ब्रकलिन अडखळली आणि तिने कोलांटी उडी मारून शर्यत पूर्ण केली.
लंडनमधील एका हायस्कूल स्पर्धेत १०० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीचा अजब शेवट पाहायला मिळाला. आतापर्यंत फिनिश लाईन पार करण्यसाठी खेळाडू आपली छाती पुढे करून फोटो फिनिशमध्ये आघाडी घेण्याचा, उडी मारून फिनिश लाईन पार करण्याचा प्रयत्न करताना अनेकदा पाहायला मिळाले असतील. पण, इथे चक्क खेळाडूने फिनिश लाईन पार करण्यासाठी कोलांटी उडी मारली. तेही एकदा नव्हे, तर दोनवेळा... सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
ओरेगॉनमधील थर्स्टन येथील ज्युनियर हायस्कूल मधील ब्रुकलिन अँडरसनने युजीन येथे झालेल्या राज्य ट्रॅक अँड फील्ड चॅम्पियनशिपमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. १०० मीटर अडथळ्याच्या शर्यतीत तिने सुवर्णपदक जिंकले. तिने १४.९३ सेकंदात अंतिम रेषा ओलांडून विजेतेपद मिळवले. पण, अंतिम रेषा पार करण्यासाठी तिने वापरलेली आयडिया चर्चेत आली आहे.
अंतिम अडथळा पार करताना आणि अंतिम रेषेपासून काही अंतर दूर असताना ब्रुकलिन अडखळली आणि ट्रॅकवर तिचा तोल गेला. पण, तिने समयसुचकता दाखवताना दोनदा समरसॉल्ट करून अंतिम रेषा पार केली. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आणि अनेक प्लॅटफॉर्मवर ५ कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
"मी अडखळले तेव्हा मला माहीत नव्हते की अन्य स्पर्धक माझ्या मागे किती मागे आहेत, म्हणून मी लगेच कोलांटी उडी मारून अंतिम रेषा पार केली," असे ती म्हणाली. अँडरसनने लांब उडी आणि १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत तिसरे स्थान मिळवले.