पुण्यात काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. आता परत पुणे शहर आणि आसपासच्या परिसरात पावसाची एन्ट्री झाल्याचे पाहायला मिळाले. पिंपरी चिंचवड शहरात दमदार पाऊस झाला. या पावसामुळे हिंजवडीतील आयटी पार्क जलमय झाला. आयटी पार्क बस स्थानक पाण्याखाली गेल्याचे पाहायला मिळाले. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
व्हायरल व्हिडीओमध्ये रस्त्यांवर पाणी साचल्याचे पाहायला मिळते. सुरुवातीलाच एक स्कूटर पाण्यात पूर्णपणे बुडाल्याचे दिसते. यावरुनच पाणी किती मोठ्या प्रमाणात साचले आहे हे लक्षात येते. त्यानंतर बस स्थानकाजवळ इतर वाहने देखील पाण्यात बुडल्या आहेत असे दिसते. रस्त्याच्या कडेला उभे राहून हा व्हिडीओ रेकॉर्ड केल्याचे म्हटले जात आहे.
काही मिनिटांसाठी पडलेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी रस्ते पाण्याने तुंबले. मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने काही भागातील दुचाकी वाहने वाहून गेली. अनेक चारचाकी वाहनांमध्ये पाणी गेले. पावसाळा सुरु होण्यापूर्वी हिंजवडीत ड्रेनेज लाईनचे काम न झाल्याने आणि नालेसफाईत दिरंगाई झाल्याने आयटी पार्कचे रुपांतर हिंजवडी वॉटर पार्कमध्ये झाल्याचे पाहायला मिळाले.
पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पावसामुळे अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईत येत्या काही तासात मुसळधार पाऊस होऊ शकतो, त्यामुळे तेथे रेड अलर्टची घोषणा करण्यात आली आहे. देखील ठिकठिकाणी दमदार पाऊस होऊ शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे. नागरिकांना सावधान राहण्याचे आवाहन प्रशासनाने दिले आहे.