पिंपरी, ता. ७ : शाळा, महाविद्यालय प्रवेश, विविध शासकीय परीक्षांसाठी आवश्यक असलेल्या दाखल्यांसाठी निगडी येथे असणाऱ्या अप्पर तहसिल कार्यालयात नागरिक, विद्यार्थी रांगा लावत आहेत. मात्र, उत्पन्नाच्या दाखले वाटपाबाबत संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये उदासीनता दिसत आहे. दाखले वाटपात धीमी गती, अधिकाऱ्यांची रजा यामुळे नागरिकांना वेळेत दाखले प्राप्त होईना झाले आहेत. यांसह रहिवासी, जातीचा दाखलादेखील वेळेत मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. तहसिल कार्यालयाच्या कारभारावर नागरिक तीव्र संताप व्यक्त करत आहेत.
गेल्या दहा दिवसांपासून पिंपरी-चिंचवड अप्पर तहसील कार्यालयाच्या लेट लतिफ कारभारावर नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत. यापूर्वी सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक अडचणी असल्याची कारणे देण्यात आली. त्यामुळे दाखले वाटप थांबले होते. सध्या तांत्रिक अडथळे दूर केल्याचा दावा अप्पर तहसीलदार करत आहेत. मात्र, दाखले मंजूर करण्यात तहसील कार्यालय उदासीनता दाखवत आहे. तीन ते चार दिवस हेलपाटे मारूनही नागरिकांना आपले दाखले प्राप्त होईना झाले आहेत. सध्या शाळा, महाविद्यालय प्रवेशाची लगबग सुरू आहे. प्रवेशाची अंतिम मुदत दोन ते तीन दिवस शिल्लक आहे. मात्र, अद्याप उत्पन्नाचे आणि रहिवासी दाखले अधिकाऱ्यांकडून मंजूर होत नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे प्रवेश कसा घ्यायचा? असा प्रश्न पालक उपस्थित करत आहेत.
वरिष्ठ अधिकाऱ्यांची अनास्था
सॉफ्टवेअरमधील तांत्रिक अडथळे दूर झाल्याचे सांगण्यात येत असले तरी दाखले वाटपाच्या महत्त्वाच्या टप्प्यावर वरिष्ठ अधिकारी रजेवर आहेत. त्यामुळे उत्पन्नाचे दाखले रखडले जात आहेत. दाखले तयार असल्याचे सांगण्यात येते. मात्र, मंजुरीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे प्रतिक्षेत असल्याने दाखले प्राप्त होत नाहीत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दाखले वाटपातील अनास्थेने दाखले रखडणाऱ्यांची संख्या वाढत आहे.
‘‘मुलीच्या उत्पन्नाच्या दाखल्यासाठी तीन दिवस झाले हेलपाटे मारत आहे. अद्याप दाखला मिळालेला नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी प्रतिक्षेत असल्याचे सांगण्यात येत आहे.
- शंकर बोंबले, नागरिक
‘‘वरिष्ठ अधिकारी रजेवर आहेत. मात्र, ऑनलाइन पद्धतीने दाखले मंजूर करून देण्याची सूचना त्यांना दिली आहे. काही तक्रारी असतील तर त्याबाबत कार्यवाही केली जाईल. दाखल्यांची गती वाढविण्याबाबत सूचना देऊ.
- जयराज देशमुख, अप्पर तहसीलदार, पिंपरी-चिंचवड
---