डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार विजय कडणे यांना जाहीर
मुलुंड, ता. ७ (बातमीदार) ः सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी सामाजिक न्याय विभागाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने सन्मानित केले जाते. यावर्षीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारासाठी ज्येष्ठ समाजसेवक विजय कडणे यांची निवड महाराष्ट्र सरकारने केली आहे.
विजय कडणे हे भांडुपमधील ज्येष्ठ समाजसेवक असून त्यांचे कार्य नेहमीच समाजाला दिशादर्शक ठरले आहे. त्यांनी हाती घेतलेल्या कामामुळे समाजातील अनेक लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल झालेला आहे. त्यांच्या या कामाची राज्य सरकारकडून दखल घेतली गेली असून सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी विजय कडणे यांचे अभिनंदन केले आहे.
विजय कडणे यांना दिला जाणारा पुरस्कार हा केवळ एक सन्मान नसून समाजातील उपेक्षित, वंचित व दुर्बल घटकांसाठी दिलेल्या आजपर्यंतच्या योगदानाचीही पावती आहे, असे वक्तव्य शिरसाट यांनी या वेळी केले.