IND A vs ENG A: भारताचा डाव साडेतीनशेच्या आतच आटोपला; दुसऱ्या दिवस अखेर इंग्लंडने ३ विकेट्स गमावल्या
esakal June 08, 2025 08:45 AM

भारताचा अ संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. शुक्रवारपासून (६ जून) सुरू झालेल्या दुसऱ्या चारदिवसीय सामन्यात भारत अ आणि इंग्लंड अ (England Lions) संघात चुरस दिसून येत आहे. या सामन्याचा शनिवारी दुसरा दिवस होता.

दुसऱ्या दिवसअखेर अद्याप इंग्लंड संघ १५६ धावांनी पिछाडीवर आहे. त्यामुळे तिसऱ्या दिवशी आता भारताचे गोलंदाज कशी कामगिरी करणार याकडे सर्वांचे लक्ष असेल.

नॉर्थॅम्पटनला सुरू असलेल्या या स्पर्धेत दुसऱ्या दिवशी संघाने पहिल्या डावातील ८३ षटकांपासून आणि ७ बाद ३१९ धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली. यावेळी तनुष कोटियन ५ आणि अंशुल कंबोज १ धावेवर नाबाद खेळत होते.

पण दुसऱ्या दिवसाच्या पहिल्याच षटकात तनुषला १५ धावांवर जोश टंगने त्रिफळाचीत केले. तनुष १५ धावांवर बाद झाला. त्यानंतर टंगनेच ८६ व्या षटकात अंशुललाही २ धावांवर माघारी धाडले, तर ९० व्या षटकात तुषार देशपांडेला ११ धावांवर जोश टंगने धावबाद केले. खलील अहमद ७ धावांवर नाबाद राहिला. त्यामुळे भारताचा पहिला डावही ८९.३ षटकात ३४८ धावांवर संपला.

या डावात पहिल्या दिवशी १६८ चेंडूत ११६ धावांची दमदार खेळी केली होती. या खेळीत त्याने १५ चौकार आणि १ षटकार मारला. याशिवाय करुण नायरने ४० धावांची आणि यष्टीरक्षक फलंदाज ध्रुव जुरेलने ५२ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.

पहिल्या डावात इंग्लंडकडून ख्रिस वोक्सने सर्वात किफायतशीर गोलंदाजी करताना ३ विकेट्स घेतल्या. याशिवाय जोश टंग आणि जॉर्ज हिल यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. फरहान अहमद आणि टॉम हेन्स यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

त्यानंतर इंग्लंडचा संघ पहिल्या डावात फलंदाजीला उतरला. त्यांच्याकडून सलामीला आलेल्या बेन मॅककिनी आणि टॉम हेन्स यांनी चांगली सुरुवात देण्याचा प्रयत्न केला. पण ८ व्या षटकात मॅककिनीला १२ धावांवर अंशुल कंबोजने ध्रुव जुरेलच्या हातून झेलबाद केले. पण त्यानंतर हेन्स आणि एमिलियो गे यांची जोडी जमली. या दोघांनी ९४ धावांची मोठी भागीदारी केली.

पण हेन्स अर्धशतक केल्यानंतर २८ व्या षटकात तुषार देशपांडेच्या गोलंदाजीवर जुरेलकडेच झेल देत बाद झाला. हेन्सने ८८ चेंडूत ५४ धावांची खेळी केली, ज्यात ९ चौकार मारले.

त्यानंतर एमिलियोला जॉर्डन कॉक्सने साथ दिली. त्यांच्यातही ६९ धावांची अर्धशतकी भागीदारी झाली. पण अखेर एमिलियो गे याचा अडथळा तनुष कोटियनने ४६ व्या षटकात दूर केला. त्याने त्याला पायचीत पकडले. एमिलियो गेने ११७ चेंडूत ६ चौकारांसह ७१ धावांची खेळी केली.

त्याच्या विकेटनंतर लगेचच दुसरा दिवस संपला. दुसरा दिवस संपला तेव्हा इंग्लंडच्या ४६ षटकात ३ बाद १९२ धावा झाल्या होत्या. जॉर्डन कॉक्स ३१ धावांवर नाबद आहे, तर कर्णधार आणि यष्टीरक्षक जेम्स ऱ्ह्यू शून्यावर नाबाद आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.