जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत १५२ स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग
कर्जत, ता. ८ (बातमीदार) ः सुधाकर भाऊ घारे फाउंडेशनच्या सौजन्याने आणि रायगड जिल्हा असोसिएशन (महाराष्ट्र कॅरम असोसिएशन संलग्न) यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा २०२५-२६चे भव्य आयोजन कर्जत येथील राष्ट्रवादी जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले आहे. या स्पर्धेत १५२ स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन खांडपे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा कर्जत कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष मधुकर घारे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि फीत कापून पार पडले. या सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मान्यवर पदाधिकारी व कॅरमप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यंदा १५२ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला असून एकूण १५१ सामने खेळवले जाणार आहेत. प्रथमच वातानुकूलित हॉलमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, खेळाडूंना उत्कृष्ट सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. स्पर्धेसाठी १६ टेबल्स लावण्यात आले असून, एकाच वेळी १६ सामने खेळवले जात आहेत. रायगड जिल्हाध्यक्ष गिरीश आप्पा तुळतुळे यांनी सांगितले, की खेळाडूंमध्ये शिस्तीचा आग्रह असून तंबाखू, मद्यपान यांसारख्या सवयींपासून दूर राहणारेच खेळाडू निवडले जातात. त्यामुळे दर्जा राखला जात असला तरी काही गुणी खेळाडू यात सहभागी होण्यास टाळाटाळ करतात. तसेच कॅरम खेळाडूंना अद्याप नोकरीच्या संधी किंवा शासकीय मान्यता मिळत नसल्याबाबतही त्यांनी खंत व्यक्त केली.