सागवे-नाखेरे येथे सापडलेल्या तोफेचे जतन करणार
esakal June 09, 2025 01:45 AM

rat8p6.jpg
69013
राजापूरः सागवे येथे सापडलेल्या तोफेसह शिवसेनेच्या युवा नेत्या अपूर्वा सामंत, भरत लाड, संदेश पटेल, ओंकार पेडणेकर.

सागवे-नाखेरे येथे सापडलेल्या तोफेचे जतन करणार
अपूर्वा सामंत ; आमदारांच्या उपस्थितीत लवकरच बैठक घेऊ
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ८ः तालुक्यातील सागवे-नाखेरे येथे रस्त्याचे काम करताना एक पुरातन तोफ सापडली असून ग्रामस्थांनी ही तोफ गावातच एका ठिकाणी ठेवली आहे. तोफ सापडून जवळपास वर्षभराहून अधिक कालावधी लोटला तरीही पुरातन तोफेची दखल पुरातत्व विभागाने घेतलेली नाही. त्या तोफेची शिवसेनेच्या युवा नेत्या अपूर्वा सामंत यांनी पाहणी केली असून ती तोफ जतन व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
तालुक्यातील सागवे भागातील वडप नाखेरे गावात रस्त्याचे काम सुरू असताना जेसीबीच्या सहाय्याने खोदाई करताना तोफ सापडल्याची घटना घडली. त्यानंतर ग्रामस्थांनी ही तोफ गावात एका ठिकाणी ठेवली आहे. मात्र या घटनेला आता एका वर्षाहून अधिक कालावधी लोटला तरी या ऐतिहासिक तोफेच्या जतन आणि संवर्धनाच्यादृष्टीने पुरातत्व विभागाने दखल न घेतल्याने ग्रामस्थांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
वडप नाखेरे गावालाही ऐतिहासिक वारसा असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यदलाशी संबंधित सरदार तेथे वास्तव्य करून होते, असे दाखले इतिहासात आहेत. त्याच ठिकाणी शिवकालीन धुळपवाडा देखील असून गावामध्ये पुरातन असे माटेश्वर मंदिर आहे. त्यामुळे सापडलेली तोफ शिवकालीन असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. मात्र, त्याबाबत कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नाही. दरम्यान, पुरातत्व विभागाने याची दखल घेवून तोफेशी संबंधित इतिहास उजेडात आणण्याकरीता प्रयत्न करावेत अशी अपेक्षा ग्रामस्थांमधून व्यक्त केली जात आहे.
शिवसेनेच्या युवा नेत्या अपूर्वा सामंत यांनी सागवे परीसरात जावून सापडलेल्या तोफेची पाहणी केली. खोदकामात सापडलेली तोफ हा ऐतिहासिक वारसा असून त्याचे जतन झाले पाहिजे असे त्यांनी सांगितले. त्यासाठी आमदार किरण सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासमवेत शिवसेनेचे भरत लाड, संदेश पटेल, ओंकार पेडणेकर आदी उपस्थित होते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.