फ्रेंच ओपन २०२५ स्पर्धेत पुरुष एकेरीचे विजेतेपद स्पेनच्या कार्लोस अल्काराजने जिंकले. त्याने हे विजेतेपद जिंकत सलग दुसऱ्यांदा फ्रेंच ओपन आपल्या नावावर केले आहे. २२ वर्षांच्या अल्काराजने अक्षरश: पराभवाचा दाढेतून सामना खेचून आला आणि पाचवे ग्रँडस्लॅम जिंकले आहे.
ऐतिहासिक ठरलेल्या या अंतिम सामन्यात त्याने इटलीच्या यानिक सिन्नरला ५ सेटमध्ये पराभूत केले. या सामन्यात दुसऱ्या मानांकित अल्काराजने ४-६, ६-७ (४-७), ६-४, ७-६ (७-३), ७-६ (१०-२) अशा फरकाने ५ सेटमध्ये सामना जिंकला.
हा इतिहासातील सर्वाधिक काळ चाललेला अंतिम सामना ठरला. तब्बल ५ तास २९ मिनिटे हा सामना झाला. तसेच ग्रँड स्लॅम फायनलमध्ये पहिल्यांदाच अल्काराज आणि सिन्नर हे दोन युवा खेळाडू आमने-सामने आले होते.
पहिले दोन सेट हरल्यानंतर आणि तीन चॅम्पियन्स पाँइंट्स वाचवल्यानंतर अल्काराजने विजेतेपद जिंकले आहे. २१ व्या शतकात फ्रेंच ओपनचे एकेरीत विजेतेपद राखणारा अल्काराज तिसराच पुरुष टेनिसपटू आहे.
या शतकात असा कारनामा केवळ गुस्तावो कुएर्टेन आणि राफेल नदाल यांनीच केला होता. तसेच तो ५ ग्रँडस्लॅम जिंकणारा ब्योर्न बोर्ग (२१) आणि राफेल नदाल (२२) यांच्यानंतरचा तिसरा युवा टेनिसपटू आहे.
साडेपाच तास चाललेला हा सामना शेवटपर्यंत रोमांचक राहिला. दोघांनीही शेवटपर्यंत कमालीची लढत दिली. पहिल्या सेटमध्ये अव्वल मानांकित यानिक सिन्नरने पहिला सेट सहज जिंकला होता. अल्काराज ४-५ ने मागे असताना त्याला मेडिकल ब्रेकही घ्यावा लागला. पण पहिल्या सेटमध्ये सिन्नरने बाजी मारली.
दुसऱ्या सेटमध्ये मात्र अल्काराजने आघाडी घेतली. त्याने दीर्घ रॅलीमध्ये अल्काराजचे वर्चस्व दिसत होते. त्याने ५-२ अशी आघाडी घेतली होती. पण सिन्नरने कमालीचे पुनरागमन केले. सिन्नरचा वेग महत्त्वाचा ठरत होता.
अखेर सेटमध्ये ६-६ अशी बरोबरी झाली आणि सामना टायब्रेकमध्ये गेला. या टायब्रेकमध्ये ७-४ असा सिन्नरने विजय मिळवत सामन्यात निर्णायक आघाडी घेतली.
त्यामुळे तिसरा सेट निर्णयाक होता. यावेळी मात्र अल्काराजने पुनरागमन केले. त्याने सिन्नरवर वर्चस्व ठेवताना बॅकहँडचा चांगला वापर केला. अल्काराजने मिळवलेली आघाडी कायम ठेवताना हा सेट ६-४ ने जिंकला आणि सामना चौथ्या सेटमध्ये गेला.
चौथ्या सेटमध्ये दोघांनी सुरुवातीला सर्व्हिस राखल्या पण नंतर सिन्नरने नंतर अल्काराजची सर्व्हिस ब्रेक केली आणि आघाडी घेतली होती. त्याने ५-३ अशी आघाडी घेतली असताना त्याच्याकडे ३ चॅम्पियनशीप पॉइंट्सही मिळाले होते. पण अल्काराजने अफलातून खेळ करताना तिन्ही चॅम्पियन्स पाँइंट्स वाचवले.
इतकंच नाही, तर अल्काराजने नंतर ६-५ अशी आघाडीदेखील घेतली. पण सिन्नरने ६-६ अशी बरोबरी झाली आणि टायब्रेक झाला. टायब्रेकमध्ये सिन्नरने २-० अशी आघाडी घेतली होती. पण अल्काराजने सलग ४ पाँइंट्स जिंकले आणि आघाडी घेतली. अखेर हा टायब्रेक अल्काराजने जिंकत सेटही जिंकला. त्यामुळे हा सामना निर्णायक पाचव्या सेटमध्ये गेला.
विशेष म्हणजे या सामन्याआधी यंदाच्या फ्रेंच ओपनमध्ये सिन्नरने एकही सेट गमावला नव्हता. मात्र अंतिम फेरीत त्याने सलग दोन सेट जिंकल्यानंतर सलग दोन सेट पराभूत झाला. सामन्यात २-२ अशी बरोबरी झाल्याने सामना पाचव्या आणि निर्णायक सेटमध्ये गेला.
या सेटमध्ये अल्काराजने ३-१ अशी आघाडी घेतली होती. पण सिन्नरनेही हार न मानता झुंज देत ५-५ अशी बरोबरी करत असं पुनरागमन केलं होतं. सिन्नरने ६-५ अशी आघाडीही मिळवली. त्यामुळे त्याला पुन्हा एकदा विजयाची संधी निर्माण झाली.
पण अल्काराजने हार मानली नाही. त्याने ६-६ अशी बरोबरी करत निर्णायक सेट टायब्रेकमध्ये नेला. टायब्रेकमध्ये अल्काराजने ७ -० ने आघाडी घेतली. पण नंतर सिन्नरने २ पाँइंट्स मिळवले. पण शेवटचे सुपर टायब्रेक अल्काराजने १०-२ फरकाने जिंकून ट्रॉफीवर नाव कोरले.
अल्काराजने याआधी २०२२ मध्ये अमेरिकन ओपन जिंकले होते. त्यानंतर २०२३ आणि २०२४ मध्ये त्याने विम्बल्डनचे विजेतेपद जिंकले आहे. २०२४ मध्येही त्याने फ्रेंच ओपन जिंकले होते.