डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरण! अटकेतील मनीषाच्या जामिनावर सरकारी पक्ष आज मांडणार म्हणणे; पोलिसांचा तपास पूर्ण, आत्महत्येच्या दुसऱ्या दिवशी डॉक्टर जाणार होते पोलिसांत...
esakal June 09, 2025 08:45 AM

सोलापूर : प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येस कारणीभूत असल्याच्या संशयातून अटकेतील मनीषा मुसळे-माने यांच्या जामिनावर जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग राजूपत उद्या (सोमवारी) न्यायालयात म्हणणे मांडणार आहेत. उन्हाळी सत्रानंतर नियमित कोर्टासमोर त्यावरील सुनावणी पार पडू शकते.

डॉ. शिरीष यांनी आतापर्यंत अनेक कठीण प्रसंगाला तोंड दिले असून रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याच्या ई-मेलमुळे आत्महत्या करणारच नाहीत, त्यांच्या आत्महत्येमागे कौटुंबिक वादच कारणीभूत असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. पण, प्रशासकीय अधिकाराबरोबरच रुग्णालयातील आर्थिक व्यवहारात लक्ष घालणाऱ्या मनीषा मुसळे माने यांचे डॉ. शिरीष यांनी सर्व अधिकार काढून घेतले होते. त्यामुळे मनीषा यांनी त्यांना त्रास द्यायला सुरवात केली आणि दोन मुलांसह स्वत:ही रुग्णालयात येऊन पेटवून घेण्याची धमकी ई-मेलद्वारे दिली होती. त्या आरोपांमुळेच डॉ. वळसंगकर व्यतीत झाले आणि त्यातूनच त्यांनी टोकाचे पाऊल उचचले, असे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांनी आतापर्यंत तपासाच्या अनुषंगाने संशयित आरोपी मनीषा मुसळे माने यांची तीनदा पोलिस कोठडी घेतली आणि तब्बल ४५ दिवसांची न्यायालयीन कोठडी (पोलिस कोठडीचे अधिकार राखून) घेतली.

या काळात पोलिसांनी मनीषा यांच्या बॅंक खात्याची माहिती काढून संबंधित व्यक्तींचे जबाब घेतले. डॉ. शिरीष वळसंगकर यांची पत्नी डॉ. उमा, मुलगा डॉ. अश्विन, सून डॉ. शोनाली यांच्यासह अन्य पाच जणांचे न्यायालयासमोर जबाब नोंदवले. आता तपास पूर्ण झाला असून आठ दिवसांत गुन्ह्याचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे. त्यानंतर मनीषा यांचे वकील प्रशांत नवगिरे न्यायालयात बाजू मांडतील.

डॉ. शिरीष जाणार होते पोलिसांकडे, पण...

रुग्णालयाच्या प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे माने यांच्या धमकीसंदर्भात आत्महत्येच्या दिवशी (१८ एप्रिल रोजी) डॉ. शिरीष वळसंगकर यांनी मुलगा डॉ. अश्विन, पत्नी डॉ. उमा व मुलीसोबत चर्चा केली होती. दुसऱ्या दिवशी १९ एप्रिलला पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद देण्याचेही ठरले होते. मात्र, त्याच रात्री डॉ. शिरीष यांनी स्वतःच्या बंदुकीतून गोळ्या झाडून आत्महत्या केली, अशी बाब पोलिसांच्या तपासात नोंदविण्यात आली आहे. तसा जबाब कुटुंबातील सदस्यांनी पोलिसांत दिल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.