इंडियन बँक
esakal June 09, 2025 11:45 AM

मकरंद विपट - ‘सेबी’ रजिस्टर्ड रिसर्च ॲनालिस्ट

भारतीय रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी (ता. ६) मुख्य व्याजदरात अर्धा टक्का कपात केली. यामुळे बँकिंग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात तेजी दिसून आली. बँक निफ्टीने शुक्रवारी (ता. ६) नवा उच्चांक गाठला. बँकिंग क्षेत्राचा अभ्यास केला, तर तांत्रिक विश्लेषणानुसार, खासगी बँकांपेक्षा सरकारी बँकांचे आलेख अधिक आकर्षक वाटतात, त्यातही मिड कॅप सरकारी बँकांचे शेअर खरेदीसाठी अधिक आकर्षक दिसतात. त्यातीलच एक बँक म्हणजे इंडियन बँक. ही एक मध्यम आकाराची बँक आहे. १९०७ मध्ये सुरू झालेली ही बँक ठेवी, कर्ज आणि सेवा देते. बँकेच्या विभागांमध्ये ट्रेझरी, कॉर्पोरेट/घाऊक बँकिंग, रिटेल बँकिंग आणि इतर बँकिंग ऑपरेशन्स समाविष्ट आहेत.

सोबतच्या आलेखात दाखविल्याप्रमाणे इंडियन बँकेच्या शेअरचा तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अभ्यास केल्यास, त्याला नवा ब्रेकआऊट मिळाल्याचे लक्षात येईल. हा ब्रेकआऊट मागील आठवड्यात मिळाला होता. मात्र, आरबीआय पॉलिसीनंतर झालेले बदलही लक्षात घेणे आवश्यक आहे.

या शेअरने कोविड काळात ४४ रुपयांची नीचांकी पातळी गाठली होती. त्यानंतर फेब्रुवारी २४ मध्ये त्याने ४८३ रुपयांची उच्चांकी पातळी गाठली आणि त्यानंतर हा शेअर ‘टाईम करेक्शन’मध्ये गेला. या करेक्शनदरम्यान, वरील पातळी ६४० रुपये आणि खालील पातळी ४९० रुपये होती. गेल्या शुक्रवारी या शेअरने या टाईम करेक्शनला ब्रेकआऊट दिला आणि तो ६३६ रुपयांवर बंद झाला. आगामी काळात या शेअरमध्ये तेजी येण्याची दाट शक्यता आहे. तांत्रिक विश्लेषणानुसार, या शेअरचा भाव १०५० रुपयांपर्यंत जाण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे मध्यम कालावधीसाठी हा शेअर खरेदी करण्यास हरकत नाही. या शेअरचा स्टॉप लॉस साप्ताहिक पातळीवर ६०० रुपये ठेवावा. स्टॉप लॉस आणि लक्ष्य गुणोत्तर १:११ असून, ते गुंतवणुकीच्यादृष्टीने अतिशय उत्तम आहे.

(डिस्क्लेमर ः या कंपनीत माझे कसलेही आर्थिक हितसंबंध नाहीत. या कंपनीकडून मला गेल्या वर्षभरात कोणत्याही प्रकारचे कॉम्पेन्सेशन मिळालेले नाही. मी या कंपनीत कोणत्याही पदावर नाही अथवा या कंपनीत माझी भागीदारी नाही; तसेच कंपनीच्या मार्केटिंग ॲक्टिव्हिटीमध्ये माझा कोणताही सहभाग नाही.)
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.