Thane Politics: प्रचारासाठी वटसावित्री सणही सोडला नाही, वडाच्या झाडाला बांधला शिंदे सेनेचा बॅनर, महिला नाराज
esakal June 11, 2025 05:45 AM

ठाणे : सर्वच सण- उत्सव राजकीय पक्षांनी आणि पुढार्यांनी हायजॅक केले असताना आता विवाहित महिलांची भावनिक गुंफण असलेली वटपौर्णिमाही त्यातून सुटली नसल्याचे ठाण्यात पहायला मिळाले आहे. येथील बी. केबीन परिसरात असलेल्या वडाच्या झाडाला शिवसेना शिंदे गटाच्या स्थानिक पदाधिकार्यांनी आपला बॅनर लावल्याचा अजब प्रकार घडला आहे.

त्यामुळे सात जन्म हाच नवरा मिळावा यासाठी वडाभोवती सात फेर्या मारताना आता राजकीय पक्षही पदारात पाडून घ्यायचा का असा प्रश्न पुजेसाठी आलेल्या महिलांनी उपस्थित केला.

नवर्याला उत्तम दिर्घ आयुष्य लाभो आणि सात जन्म हाच नवरा मिळावा यासाठी मंगळवारी वटसावित्रिचा सण महिलांनी उत्साहात साजरा केला. सकाळपासूनच नटूनथटून महिलांनी वडाच्या झाडाचे पुजन केले. पण ठाण्याच्या बी. केबिन परिसरात विचित्र प्रकार घडल्याने पुजनासाठी आलेल्या बहूसंख्य महिलांचा हिरमोड झाल्याचे पहायला मिळाले.

येथील वडाच्या झाडाला असलेल्या कट्ट्याला शिवसेना शिंदे गटाचे बॅनर लावण्यात आले होते. वास्तविक गणेशोत्सव असो वा कोणताही सण, राजकीय पक्षाची शुभेच्छा देणारी बॅनरबाजी नेहमीच पहायला मिळत होती. पण वटपौर्णिमा सण याला आतापर्यंत अपवाद ठरत होता.

वटपौर्णिमेला वडाचे वृक्षाचे पुजन होत असल्याने ही संधी साधत शिवसेना शिंदे गटाने येथे बॅनर लावल्याचे दिसले. शिवसेना प्रभाग क्रमांक २१ आणि त्यावर धनुष्यबाणाचे चिन्ह होते. कट्ट्यावरच हा बॅनर लावला असल्याने वडाला फेर्या मारताना आपसूकच बॅनरभोवतीही फेरी लागत होती.

त्यामुळे जन्मोजन्मी हाच नवरा मिळावा अशी मनोकामना करताना हा पक्षही पदरात पडत असल्याची संतप्त प्रतिक्रीया यावेळी काही महिलांनी दिली. शिवसेना शिंदे गट असो वा इतर कोणताही पक्ष असो. त्यांना महिलांच्या भावनांशी खेळण्याचा अधिकार कोणी दिला असा प्रश्नही यावेळी नाराज महिलांनी व्यक्त केला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.