किवळे, ता. १० : स्त्रीशक्तीच्या श्रद्धा आणि सांस्कृतिक जाणिवा जपणाऱ्या ‘सखी ग्रुप’मार्फत वटपौर्णिमा सण उत्साहात साजरा करण्यात आला. किवळे, देहूरोड आणि मामुर्डी परिसरातील विविध ठिकाणी सुवासिनींनी एकत्र येत वडाच्या झाडांची मनोभावे पूजा केली. पारंपरिक वेशभूषा, पूजा साहित्य आणि वडाभोवती प्रदक्षिणा घालत महिलांनी धार्मिक वातावरण साकारले. श्रद्धा आणि सौंदर्य यांचा संगम असलेले हे दृश्य परिसरात सर्वत्र दिसून आले. संयोजन अमृता कानेटकर, पल्लवी देशपांडे, रावी जोशी, मेघना पेंडसे आणि लीना शिंदे यांनी केले.