ग्रीन करिअर्स - नवी दिशा
esakal June 11, 2025 11:45 AM

- अद्वैत कुर्लेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, अपोहन मॅनेजमेंट कन्सल्टंट्स

आपण आज पर्यावरणीय संकटांच्या उंबरठ्यावर उभे आहोत, हवामान बदल, प्रदूषण, जंगलतोड, पाण्याची टंचाई अशा अनेक समस्यांनी जगाला ग्रासले आहे. या संकटांना तोंड देण्यासाठी आणि शाश्वत विकास घडवण्यासाठी ‘ग्रीन करिअर्स’ ही एक नवी आणि अत्यावश्यक दिशा निर्माण झाली आहे. ग्रीन करिअर म्हणजे असे व्यवसाय किंवा क्षेत्र जे पर्यावरण संवर्धन, नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण आणि टिकाऊ तंत्रज्ञान यावर आधारित आहेत.

ग्रीन करिअर म्हणजे नेमकं काय?

ग्रीन करिअर्स हे असे कामकाजाचे क्षेत्र आहे जे पर्यावरणाच्या दृष्टीने हितकारक आहे. यात ऊर्जा बचत, पुनर्वापर, हरित ऊर्जा, जलसंधारण, पर्यावरणीय शिक्षण, आणि शाश्वत कृषी यांसारख्या अनेक विषयांचा समावेश होतो.

उदयोन्मुख क्षेत्रे आणि संधी

  • पर्यावरणशास्त्रज्ञ - पर्यावरणीय परिणामांचे विश्लेषण करणारे तज्ज्ञ.

  • क्लायमेट अॅनालिस्ट - हवामान बदलांचे मॉडेल तयार करणारे व शासकीय धोरणांना दिशा देणारे व्यावसायिक.

  • रिन्युएबल एनर्जी इंजिनिअर्स - सौर, पवन किंवा जलऊर्जेच्या प्रकल्पांवर काम करणारे अभियंते.

  • ग्रीन आर्किटेक्ट्स - ऊर्जा कार्यक्षम, नैसर्गिक प्रकाशाचा वापर करणाऱ्या इको-फ्रेंडली इमारती डिझाईन करणारे वास्तुविशारद.

  • सस्टेनेबिलिटी कन्सल्टंट्स - कंपन्यांना त्यांच्या उत्पादन आणि सेवा पर्यावरणपूरक कशा करता येतील याबद्दल सल्ला देणारे तज्ज्ञ. ग्रीन बिल्डिंग्ज, कार्बन क्रेडिट्स, झीरो कार्बन या गोष्टी महत्त्वाच्या होत आहेत.

शिक्षण आणि कौशल्ये

या क्षेत्रात करिअर करायचे असल्यास पर्यावरणशास्त्र, बायॉलॉजी, केमिस्ट्री, अर्थ सायन्स, सॉईल इंजिनिअरिंग, भूगोल, किंवा पर्यावरणीय अभियांत्रिकी यामध्ये शिक्षण घेणे उपयुक्त ठरते. याशिवाय, विश्लेषण, समस्या सोडविण्याची क्षमता, आणि पर्यावरणाबद्दलची जाणीवसुद्धा महत्त्वाची आहे.

सामाजिक आणि व्यक्तिगत समाधान

ग्रीन करिअर केवळ उत्पन्नाचे साधन नसून, पृथ्वीचे रक्षण करण्यासाठीचा एक सक्रिय प्रयत्न आहे. या क्षेत्रात काम करून तुम्ही केवळ स्वत-चे भवितव्य सुरक्षित करत नाही, तर पुढच्या पिढ्यांसाठीही जगण्याजोगे पर्यावरण निर्माण करत आहात. माझ्या अनुभवात फक्त मोठ्याच कंपन्या नाहीतर लहान कंपन्याही आता याविषयी जागरूकता दाखवायला लागल्या आहेत.

निष्कर्ष

तुम्हाला निसर्गाची ओढ, विज्ञानात रुची असेल आणि समाजासाठी काहीतरी सकारात्मक करायचे असेल, तर ग्रीन करिअर ही तुमच्यासाठी योग्य दिशा ठरू शकते.

पृथ्वी वाचवा आणि आपल्या करिअरलाही हरित झळाळी द्या!

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.