अंबादास दानवे यांनी घेतली प्रकाश महाजन यांची भेट
Marathi June 12, 2025 07:24 AM

भारतीय जनता पक्षाचे नेते नारायण राणे आणि मनसे नेते प्रकाश महाजन यांच्यामध्ये शाब्दिक संघर्ष झाल्यानंतर आज बुधवारी बीड बायपास परिसरातील प्रकाश महाजन यांच्या निवासस्थानी शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जाऊन त्यांची भेट घेतली.

खासदार नारायण राणे आणि प्रकाश महाजन यांचा मागील दोन दिवसांपासून जो संघर्ष सुरू झाला त्यानिमित्त ही भेट होती. प्रकाश महाजन यांचे एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. कोणत्याही राजकीय लढाईसाठी ते सक्षम असून आपल्या लढाईसाठी त्यांना कोणाची आवश्यकता नसल्याचे दानवे यांनी सांगितले.

नारायण राणे यांची मुले ज्या पद्धतीने बोलतात, ते अत्यंत घाणेरडय़ा पद्धतीचे आहे. राजकीय संस्कृतीत अशा पद्धतीने खालच्या पातळीवर जाऊन गलिच्छ बोलणे योग्य नाही. नारायण राणे हे महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यामुळे सहाजिकच त्यांच्यावरती एक नैतिक मोठी जबाबदारी असून त्यांनी बोलण्याचा स्तर पाळला पाहिजे, अशी अपेक्षा दानवे यांनी व्यक्त केली.

… तरी ते गटारातच उडी मारणार

– नारायण राणे यांची दोन्ही मुले ज्या प्रकारे बोलतात त्यांच्यावरती संस्कार झालेले दिसत नाहीत. नितेश राणे यांनी देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत काय वक्तव्य केले आहे याची सर्व राज्याला कल्पना आहे. बेडकाला सोन्याच्या पाळण्यात बसविले तरीही उडी मात्र ते गटारातच मारणार या मराठवाडय़ातील म्हणीचा संदर्भ देत प्रकाश महाजन यांनी नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.