पोटगीचे पैसे, दागिने लुटून केला गर्भपात
esakal June 12, 2025 11:45 PM

नवी मुंबई, ता. १२ (वार्ताहर) : पहिल्या पतीच्या छळाला कंटाळून विभक्त झालेल्या व दुसऱ्यासोबत घरोबा करणाऱ्या एका महिला डॉक्टरची दुसऱ्या पतीनेही छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. पहिल्या पतीपासून मिळालेली पोटगीची रक्कम, दागदागिने अशी तब्बल ७५ लाख ५० हजारांची रक्कम हडप करून मारहाणीत तिचा गर्भपात घडवून आणल्याचे उघडकीस आले आहे. एनआरआय पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
घटनेतील ३४ वर्षीय डॉक्टर महिला मुलुंडमध्ये राहण्यास आहे. सध्या ती मुंबईतील एका खासगी रुग्णालयात कार्यरत आहे. २०१४ मध्ये तिचा नेरूळमधील तरुणासोबत विवाह झाला होता. लग्न झाल्यानंतर पतीने तिला त्रास देण्यास सुरुवात केल्याने तिने १० वर्षांच्या मुलाला सोडून आपले माहेर गाठले. त्यानंतर तिची २०२० मध्ये सीवूड्स येथे राहणाऱ्या अजिंक्य पाटील याच्यासोबत फेसबुकवरून मैत्री झाली. त्यांच्यामध्ये भेटीगाठी वाढल्यानंतर अजिंक्यने डॉक्टरला लग्नाची मागणी घातली. पहिल्या पतीपासून घटस्फोट मिळाल्यानंतर तिच्यासोबत लग्न करण्याचे आश्वासन अजिंक्यने दिल्याने महिला डॉक्टर त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्या घरी राहण्यासाठी गेली; मात्र त्याने तिला त्रास देण्यास सुरुवात केली. पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर मार्चमध्ये डॉक्टरने अजिंक्यसोबत बेलापूर येथील गोवर्धनी माता मंदिरात लग्न केले. लग्नानंतर अजिंक्यने तिच्यावर संशय घेऊन तिला मारहाण करणे, मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली.
------------------
कार विकली, दागिने ठेवले गहाण
पहिल्या पतीपासून डॉक्टरला मिळालेली ५५ लाखांची पोटगीची रक्कम अजिंक्यने स्वत:च्या खात्यात वळती करून घेतली. डॉक्टरचे सर्व दागिने गहाण ठेवून २० लाखांचे कर्ज घेतले. डॉक्टरच्या मालकीची कार दोन लाखांत विकून त्याची रक्कमसुद्धा त्याने हडप केली. त्यानंतर अजिंक्यने या डॉक्टरला बाहेर जाण्यास बंदी केली. तिच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून तिला एका रूममध्ये डांबून ठेवण्यास सुरुवात केली.
---------------------
लाथा मारून केला गर्भपात
डॉक्टरने आपल्या माहेरी फोन करून सर्व हकिगत सांगितल्याने अजिंक्यने तिला मारहाण करून तिचा मोबाईल फोन काढून घेतला. महिला डॉक्टर गर्भवती असल्याचे समजल्यानंतर अजिंक्यने तिच्या पोटात लाथ मारली. त्यामुळे तिला रक्तस्राव सुरू झाला. त्यामुळे या डॉक्टरने मुलुंड येथील आपले माहेर गाठून रुग्णालयात तपासणी केल्यानंतर तिचा गर्भपात झाल्याचे उघड झाले. त्यानंतर तिने मुलुंड येथील नवघर पोलिस ठाण्यात अजिंक्यविरोधात तक्रार दाखल केली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.