लोणावळ्यात ३९० वाहनांवर कारवाई
esakal June 13, 2025 10:45 PM

लोणावळा, ता.१३ : शहरात वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या तब्बल ३९० वाहनांवर लोणावळा शहर पोलिसांच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे. कारवाईदरम्यान तीन लाख ८० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. गेल्या तीन दिवसांत वाहतूक विभागाकडून ही कारवाई करण्यात येत आहे.
लोणावळा शहर पोलिसांच्या वतीने वाहतूक व्यवस्थेत बदल करत विविध उपाययोजना करण्यात येत आहे. जयचंद चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकादरम्यान पोलिसांच्या वतीने प्रायोगिक तत्त्वावर प्लास्टिकचे रस्ता दुभाजक लावण्यात आले आहेत. वाहतूक नियमांबाबत नागरिकांमध्ये जागृती करण्यात येत आहे.
मात्र, वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या तसेच वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या व रस्त्यामध्ये चुकीच्या पद्धतीने उभ्या करण्यात आलेल्या ३९० वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. ‘‘नियमित सुरू असलेल्या कारवाईप्रमाणेच सदरची कारवाई सुरू असून नागरिकांनी वाहतुकीची शिस्त व नियम पाळावेत,’’ असे आवाहन लोणावळा शहरचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांनी केले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.