एअर इंडिया प्लेन क्रॅश अहमदाबाद: अहमदाबादहून लंडनकडे निघालेल्या एअर इंडिया एआय-171 विमानाच्या भीषण अपघाताने संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. गुरुवारी दुपारी सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच हे विमान मेघानीनगर परिसरात कोसळले. या भीषण दुर्घटनेत 241 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, त्यामध्ये 12 क्रू मेंबर्सचाही समावेश आहे. या हृदयद्रावक घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अहमदाबादला पोहोचत अपघातस्थळाची पाहणी केली. माध्यमांशी संवाद साधताना गृहमंत्री शाह यांनी विमानात सुमारे 1,25,000 लिटर इंधन भरलेलं होतं. अपघातानंतर काही क्षणांतच इतकी भीषण आग लागली की, कुणालाही वाचवण्याची संधीच मिळाली नाही, असे वक्तव्य केले. आता यावर शिवसेना ठाकरे खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केलाय.
संजय राऊत म्हणाले की, एअर इंडियाचे विमान कोसळणे ही या देशामध्ये हवाई वाहतूक करणाऱ्या प्रवाशांसाठी चिंताजनक आणि अस्वस्थ करणारी घटना आहे. अत्यंत सुरक्षित समजले जाणारे आहे ड्रीमलाईनर विमान टेक ऑफनंतर एका मिनिटाच्या आत कोसळतं आणि त्यातला एक प्रवासी वगळता 241 प्रवासी मृत्यू पावतात. हे विमान ज्या वैद्यकीय हॉस्टेलवर कोसळले त्यातले 24 डॉक्टर आणि 60 च्या आसपास मेडिकलचे विद्यार्थी मरण पावले. गुजरात राज्याचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचेही त्यात निधन झाले. इतकं होऊन देखील या अपघाताची जबाबदारी कोणी घ्यायला तयार नाही. रेल्वेचे अपघात होत आहेत, पहलगाम सारख्या दहशतवादी हल्ल्यामध्ये लोकांचे बळी जात आहेत. विमानाचे अपघात होत आहेत. पण सरकारच्या चेहऱ्यावर मला दुःखाची एक रेषाही दिसत नाही, वेदनाही दिसत नाही, पश्चाताप दिसत नाही, असा हल्लाबोल त्यांनी केला.
मग यांना काय टाळता येतं?
कालच्या विमान अपघाताचे कोणीही राजकारण करू नये. कारण मृत पावलेले हे भारतीय असतील किंवा परदेशी नागरिक असतील, ते आपल्या भारतातून एअर इंडियाने प्रवास करत होते. यात भारतीय हवाई क्षेत्राची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. एअर इंडियाचे खासगीकरण सरकारने केले आहे आणि ते टाटांना दिले आहे. टाटा यांनी प्रत्येकी एक कोटी रुपये दिले म्हणून प्रश्न संपत नाही. इतका मोठा तांत्रिक बिघाड झाला. जे विमान लंडनला चाललेले आहे त्याचे दोन्ही इंजिन बंद पडतात, तर कोणी म्हणतात पक्ष्याने धडक मारली, काहीही असो त्याचा ब्लॅक बॉक्स मिळाल्यावर चौकशी होईल. पण इतका मोठा अपघात होतो. हा एक अपघात आहे आणि हा अपघात टाळता येत नाही, असे अमित शहा म्हणतात. तेव्हा या देशावर कोणत्या प्रकारचे राज्य लादलेले आहे? रेल्वेचे अपघात टाळता येत नाही. पहलगामचा हल्ला टाळता येत नाही. अहमदाबाद सारखा भयंकर विमान अपघात टाळता येत नाही. मग यांना काय टाळता येतं? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.
तेव्हा प्रश्न उपस्थित करणारे भाजपचेच लोक होते
संजय राऊत पुढे म्हणाले की, आम्हाला या विषयात राजकारण करायचे नाही. ड्रीमलाईनर जेव्हा विकत घेतले तेव्हा त्या ड्रीमलाईनरच्या खरेदीबाबत, तांत्रिक मुद्द्याबाबत प्रश्न उपस्थित करणारे भारतीय जनता पक्षाचेच लोक होते. प्रफुल पटेल सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर होते आणि त्यांना प्रश्न विचारणारे भारतीय जनता पक्षाचेच लोक होते, हे एकच माझ्या आज स्मरणात असल्याचे म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला.
या देशात एका उत्सवी राजाचं सरकार
ड्रीमलाईनर विमानाच्या खरेदीत काही गैरव्यवहार झाला आहे का? दबावाखाली ही खरेदी झाली आहे का? 300 पेक्षा लोकांचे प्राण त्यात गेले आहे, त्यामुळे आम्हाला चिंता वाटत आहे आणि हे प्रश्न आम्हाला उपस्थित करत आहोत. त्यात महाराष्ट्रातले दहा ते पंधरा लोक आहेत. याची जबाबदारी कोण घेणार आहे? जेव्हा अशा प्रकारचे अपघात यूपीएच्या राजवटीत व्हायचे तेव्हा भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष किंवा भाजपचे विरोधी पक्ष नेते संबंधित मंत्र्यांचा राजीनामा मागत होते. त्या वेळेला राजीनामे देण्यात आलेले आहेत आणि तुम्ही खुशाल बसलेले आहात, जागेवर जात आहात, शूटिंग करत आहात. माणसं मेली आहेत त्या राखेवर पाय ठेवून तुम्ही चित्रण करत आहात. या देशाचं दुर्दैव आहे की, एका उत्सवी राजाचं सरकार या देशात आलेलं आहे, असे म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.
आम्ही तुमच्या देशात सुरक्षित नाही
30 सेकंदात विमान कोसळत आहे. ज्यात 242 प्रवासी आहेत. याचा अर्थ हे विमान उड्डाण करताना तंत्रज्ञांनी त्याला ओके केलेले आहे. त्याशिवाय ते विमान लंडनला जाण्यासाठी उडणार नाही. तरीही तीस सेकंदात विमानाची दोन्ही इंजिन बंद पडतात. मग गडबड का नाही? याची चौकशी केली जाईल. चौकशीतून जे निष्पन्न होईल ते भविष्यात येईल. पण, आता 242 लोक, डॉक्टर्स आणि मेडिकलचे विद्यार्थी यांच्या मृत्यूची जबाबदारी कोण घेणार? हा एक अपघात होता, असे अमित शहा म्हणतात. अपघात टाळता येत नाहीत, असे त्यांनी सांगितले. तुम्हाला अपघात टाळता येत नाही. पहलगामचा हल्ला सुद्धा टाळता येत नाही. मग तुम्ही सत्तेवर कशाला आहात? आम्ही तुमच्या देशात सुरक्षित नाही. रेल्वे प्रवासी सुरक्षित नाहीत. हवाई प्रवास करणारे लोक सुरक्षित नाहीत. पर्यटक सुरक्षित नाहीत. मणिपूरचे जनता सुरक्षित नाहीत. मग तुमच्या राज्यात सुरक्षित कोण आहे याचे उत्तर अमित शाह यांनी द्यायला हवे, असेही संजय राऊत यांनी म्हटले.
https://www.youtube.com/watch?v=fbxds9h0ntu
आणखी वाचा
आणखी वाचा