Pune News : अनियमित कचरा संकलन वेळेमुळे कोथरूडमध्ये वाहतूक ठप्प
esakal June 13, 2025 09:45 PM

कोथरूड : एसएनडीटी महाविद्यालयासमोरील गल्लीत रोज सकाळी मोठा डंपर लावून कचरा वर्गीकरण व संकलन करण्याचे काम केले जात आहे. हा डंपर दुपारपर्यंत गल्लीत असतो. त्यामुळे येथील वाहतूक गेल्या पंधरवड्यापासून विस्कळित झाली आहे.

पूर्वी हेच काम आतील गल्लीत सुरू होते, पण तेथे पुढील बाजूस पुनर्विकासाचे काम सुरू झाल्यापासून हे काम एसएनडीटी महाविद्यालयासमोरील गल्लीत सुरू झाले आहे. नागरिकांना त्रास होईल अशा प्रकारे कचरा संकलन व वर्गीकरणाचे काम करू नये. हे काम त्वरित थांबवावे.

या कामासाठी प्रभागातील इतर ठिकाणची योग्य जागा निवडावी, अशा मागण्यांचे निवेदन एरंडवणे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गुरुवारी (ता. १२) वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय व कोथरूड वाहतूक विभागाला देण्यात आले आहे. यावेळी मंडळाचे अध्यक्ष प्रशांत वेलणकर व खजिनदार सुरेश निंबाळकर उपस्थित होते.

यासंदर्भात वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त दीपक राऊत म्हणाले की, कचरा संकलन व वर्गीकरण करण्यासाठी जागांचा शोध सुरू आहे. लवकरच त्यावर मार्ग निघेल.

बेशिस्त नागरिकांमुळे समस्या

कचरावेचक घरोघरी जाऊन कचरा गोळा करतात. बहुतांशी नागरिक घरी कचरा वर्गीकरण करत नसल्याने गोळा झालेल्या कचऱ्याचे वर्गीकरण एका जागी करावे लागते. कचरा वेचकांना नागरिकांनी वर्गीकरण करून कचरा दिला, तर त्यांचे काम अधिक सुलभ होऊ शकते, मात्र तसे होत नसल्याने वेचकांना हा कचरा एका जागी एकत्रित करून त्यानंतर त्याचे वर्गीकरण करून तो मोठ्या वाहनात जमा करावा लागतो. त्यासाठी कोणीही आपल्या परिसरातील जागा देण्यास तयार नसतो.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.