Maharashtra Political Live Updates : वाहतूक कोंडींवरुन भुजबळ अधिकाऱ्यांवर भडकले म्हणाले, तुम्हाला हॉटेलमध्ये जायला वेळ..
Sarkarnama June 14, 2025 09:45 PM
Nashik News : वाहतूक कोंडींवरुन भुजबळ अधिकाऱ्यांवर भडकले म्हणाले, तुम्हाला हॉटेलमध्ये जायला वेळ..

मुंबई नाका ते द्वारका दरम्यान उड्डाणपुलाखाली भिक्षेकरी तळ ठोकून बसतात आणि सर्व्हिस रोडवर अतिक्रमणाने वाहतूक विस्कळीत होते, याकडे छगन भुजबळ यांनी लक्ष वेधले. मात्र, याबाबत विचारणा केली असता महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी "हे आमच्या अखत्यारीत येत नाही," असे हात झटकले. या उडवाउडवीच्या उत्तराने भुजबळ चांगलेच खवळले.


भुजबळ म्हणाले, "मी मुंबई महापालिकेचा कारभार पाहिलाय, कोणाचे काय काम असते हे मी व्यवस्थित जाणतो. जर अधिकारी काम करत नसतील, तर मी स्वतः रस्त्यावर उतरतो," असा थेट इशारा त्यांनी दिला. महापालिका अधिकारी सध्या इतके 'बिझी' झालेत की, मानस हॉटेलमध्ये जाण्याचा वेळ आहे, पण समस्यांची पाहणी करण्यासाठी वेळ नाही, अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट सुनावले.

School Fees News : शाळेच्या शुल्कवाढीबाबत नवे धोरण जाहीर

खासगी शाळांकडून अवाजवी शुल्कवाढ केली जाते. मात्र आता शुल्कवाढीविरोधात एका पालकाचीही तक्रार ग्राह्य मानली जाणार आहे. शुल्कवाढीला विरोध करण्यासाठी आता 25 टक्के पालकांनी एकत्र येण्याची अट आहे. पालकांची ही कोंडी येत्या काळात फुटण्याची शक्यता आहे. अवाजवी शुल्कवाढीबाबत एका पालकाचीही तक्रार ग्राह्य धरण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक असलेली तरतूद करण्याचा विचार शासनाकडून केला जात आहे. अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे.

नाशिक मध्ये डिसेंबरमध्ये होणार विश्व मराठी संमेलन

नाशिक येथे २६ ते २८ डिसेंबर २०२५ या कालावधीत विश्व मराठी संमेलन होणार आहे. या संमेलनाच्या पूर्व तयारीसाठी कार्यालय सुरू करून नियोजनाचा नियमितपणे आढावा घ्यावा, अशा सूचना उद्योग, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिल्या आहेत.

मंत्री श्री. सामंत म्हणाले की, अभिजात मराठी भाषेच्या वैश्विक प्रचार आणि प्रसारासाठी जगभरातील मराठी भाषकांनी एकत्र येऊन एकाच व्यासपीठावर सर्वांगीण चर्चा व्हावी म्हणून विश्व मराठी संमेलन होत आहे. या संमेलनासाठी मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सहकार्य मिळणार आहे. या संमेलनानिमित्त विविध कार्यक्रम होतील. त्यांना उत्तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा स्पर्श लाभलेला असेल. या संमेलनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल. यासाठी विविध समित्या गठित करण्यात येतील. या संमेलनाचे कार्यालय नाशिक येथे १६ ऑगस्ट २०२५ पासून कार्यान्वित होईल. या कार्यालयाच्या माध्यमातून संमेलनाच्या तयारीचा नियमितपणे आढावा घेण्यात येईल. या संमेलनात अधिकाधिक विद्यार्थ्यांचा सहभाग असेल, असे नियोजन करण्यात येईल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.