आनंदी जगण्याचा अवघड ठराव
esakal June 15, 2025 01:45 PM

रेखा इनामदार- साने- editor@esakal.com

पुस्तकाचे नाव:

तंदुरुस्त राहा, खुशीत जगा

लेखक: डॉ. राजीव शारंगपाणी

प्रकाशक : साकेत प्रकाशन, पुणे व छत्रपती संभाजीनगर

(संपर्क : ९४२२२२५४०७, ९८८१७४५६०५)

पृष्ठे : १७६ मूल्य : २५० रुपये.

सर्वसामान्य शहाणपण ज्या काळात उत्तरोत्तर दुर्मीळ होत चालले आहे. सहज ज्ञान जेथे अप्राप्य झाले आहे आणि (विशेषतः) उच्चशिक्षित अभिजनांचे हात व डोके यांची पूर्ण फारकत होताना दिसते आहे - त्या काळात एका केवळ निष्णातच नव्हे तर बहुआयामी ‘हाडा’चा शल्यविशारद असलेल्या वैद्यकतज्ज्ञाला ‘तंदुरुस्त राहा, खुशीत जगा’ हे आवर्जून सांगावेसे वाटले आहे, यात नवल नाही. ‘साप्ताहिक सकाळ’ मधून प्रसिद्ध झालेले एकूण ३७ लेख येथे संग्रहरूपाने समोर आले आहेत.

यावरून वरवर साध्या सोप्या वाटणाऱ्या या शीर्षकांतर्गत जे स्तंभलेखन डॉ. राजीव शारंगपाणी यांनी केले आहे, त्याची आजही असलेली लोकप्रियता व प्रस्तुतता अधोरेखित होते. ज्यांना देह-मनाने निरोगी व निर्मळ राहायचे आहे, किमान तसा प्रयत्न करायचा आहे, त्यांना सतर्क व सजग करणारे हे लेखन आहे. जे निद्रिस्त व निष्क्रिय आहेत, त्यांचे डोळे उघडणारे मार्गदर्शन यात आहे आणि जे पैसा, पद व प्रतिष्ठा यांच्या मागे लागण्यात दंग झालेले आहेत, त्यांच्या पावलांना योग्य वाटेने जाण्यास प्रवृत्त करणारे आहे. म्हणून प्रस्तुत पुस्तक निर्विवादपणे महत्त्वपूर्ण तर आहेच; पण ते ‘मूल्यवानही’ आहे.

स्थलकालमर्यादा असूनही किंवा ती असल्यामुळेच हे लेखन गोळीबंद स्वरूपाचे व अर्क अथवा गाभा थेटपणे अभिव्यक्त करणारे आहे. किंबहुना निर्भीडपणे आपल्याला जे पटते, अनुभवांतून जाणवते ते अजिबात न कचरता, वाचकांच्या रागा-लोभाची, अनुकूल-प्रतिकूल प्रतिक्रियांची जराही पर्वा न करता शब्दांकित करणे ही लेखकाची प्रवृत्ती आहे, याचा पुरेपूर प्रत्यय या लेखनातून येतो. त्यामुळे लेखकाचे प्रतिपादन निःसंदिग्ध व स्पष्ट असते.

मूलतः शारीरिक हालचालींची कमतरता, सारे काही बसल्या जागी विनासायास आयते मिळवण्यावर दिला जाणारा भर, दैनंदिन जीवनक्रमात नोकरी-व्यवसायामुळे येणारे ताण, स्पर्धात्मकता, व्यायामाचा आणि पुरेशा विश्रांतीचा अभाव, प्रदूषणामुळे होणारे श्वसनाचे विकार, परिणामी येणारा लठ्ठपणा आणि लवचीकतेची पूर्णतः उणीव अशा अनेकानेक कारणांमुळे अस्वास्थ्य व अनारोग्य दिवसेंदिवस वाढत जाते. जोपर्यंत त्यातून काहीतरी ‘झटका’ बसत नाही, तोपर्यंत आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. निदान झाले तर भविष्याविषयी वाटणाऱ्या भयाने वैद्यकतज्ज्ञाकडे जाणे टाळतो. औषधोपचार घेणे लांबवत राहतो; पण अशा पलायनाने प्रश्न सुटत तर नाहीतच, उलट कधीकधी ते उग्ररूप घेतात तेव्हा वेळ निघून गेलेली असते. असे विपरीत घडूच नये म्हणून जी दक्षता घेणे आवश्यक आहे, ती या ठिकाणी सर्व लेखांतून वारंवार आग्रहपूर्वक सांगितली आहे.

स्वाभाविकपणेच हे पुस्तक व्यक्तिकेंद्रित नसून समाजकेंद्रित आहे. एकीकडे निदानातील अचूकता वैद्यकीय चाचण्यांमुळे शक्य झाली आहे. उपचारात अद्ययावत तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे सुलभता आली आहे तर दुसरीकडे नित्यनव्या आजारांचे व रोगांचे भस्मासुर माणसांना ग्रासून टाकत आहेत. तूर्तास निरनिराळ्या उपचार पद्धतींचेही पेव फुटले आहे. माहितीचे मायाजाल प्रत्येकाला तळहातावर उपलब्ध आहे आणि तरीही माणसे असमाधानी, असंतुष्ट व कुठल्या ना कुठल्या दुखण्याने त्रस्त आहेत. चिंता आणि भयाने, अनिश्चिततेने त्यांचा ताबा घेतला आहे. यातून सुटका कशी होणार? मुळात ती होणार की नाही? याचे ठोस आणि ठाम उत्तर या पुस्तकात मिळते. रोज किमान एक तास स्वतःच्या आरोग्यासाठी देणे अशक्यप्राय आहे का? चालणे, पळणे, वाकणे, लिहिणे, खाली मांडी घालून काही मिनिटे बसणे, एखाद्या खेळात सहभागी होणे, गाणे गुणगुणणे, मोकळ्या वेळात ‘खरोखरी’ मजा करणे, मनापासून दुसऱ्यांशी संवाद साधणे, साधीसोपी आसने करणे, उत्तमोत्तम साहित्य वाचणे, चित्रपट-नाटकांचा आस्वाद घेणे, आपल्याला रम्य वाटणाऱ्या जागी चार क्षण रेंगाळणे, शांत उभे राहून जेथे आहोत तेथून सूर्योदय-सूर्यास्त पाहणे, पक्षी (असतील तर!) निरीक्षण करणे, त्यांचे नानाविध आवाज ऐकणे यातले काहीही खर्चीक नाही, ते कठीणही नाही, देहा-मनाला उभारी देणारेच नव्हे तर उल्हसित करणारे आहे. मग, तरीही आपण ते न करून आजारांना निमंत्रण का देतो? का याचा आपल्याला विसर पडला आहे? पैसे, अधिक पैसे त्यातून स्थैर्य, सुरक्षितता मिळवण्याच्या नादात आपण काय आणि किती हरवून बसलो आहोत, याची कसून झाडा-झडतीच लेखकाने घेतली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.