WTC जिंकली, पण नंबर-1चं स्वप्न अधूरंच! ICC रँकिंगमध्ये दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का, तर टीम इंडि
Marathi June 16, 2025 03:24 AM

आयसीसी चाचणी रँकिंग अद्यतनित बातम्या: क्रिकेटविश्वासाठी आणि विशेषतः दक्षिण आफ्रिकेसाठी एक ऐतिहासिक क्षण.. तब्बल 27 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर दक्षिण आफ्रिकेने अखेर आयसीसी ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. 2025 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात गतविजेता ऑस्ट्रेलियावर थरारक विजय मिळवत 5 विकेट्सने सामना जिंकला आणि क्रिकेटच्या इतिहासात एक नवीन पान लिहिलं. टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघाने फक्त क्रिकेटच खेळलं नाही, तर इतिहास लिहिला. आता 2025-27 च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचे चक्र लवकरच सुरू होणार आहे, त्याआधी कसोटीची नवीनतम क्रमवारी जाहीर झाली आहे.

WTC जिंकली, पण नंबर-1चं स्वप्न अधूरंच!

2025 च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा उपविजेता ऑस्ट्रेलिया सध्या कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे, ज्याचे सध्या 123 गुण आहेत. 2025 च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा विजेता दक्षिण आफ्रिकेला फायदा झाला आहे. ज्यामुळे ते दुसऱ्या स्थानावर आले आहे, ज्याचे आता 114 गुण आहेत, पण रँकिंगमध्ये नंबर-1चं त्याचं स्वप्न अधूरंच राहिलं. इंग्लंड 113 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

आयसीसी रँकिंगमध्ये टीम इंडिया कुठं?

काही महिन्यांपूर्वीपर्यंत, भारतीय संघ कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर होता. परंतु न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग मालिका गमावल्यानंतर तो चौथ्या स्थानावर आहे. ज्याचे सध्या 105 गुण आहेत. 2021 च्या वर्ल्ड कपचा विजेता न्यूझीलंड पाचव्या स्थानावर आहे आणि श्रीलंका सध्या सहाव्या स्थानावर आहे. पाकिस्तान सातव्या स्थानावर आहे, वेस्ट इंडिज आठव्या स्थानावर आहे, बांगलादेश नवव्या स्थानावर आहे आणि आयर्लंड दहाव्या स्थानावर आहे.

टीम इंडियाच्या नवीन पर्वाची सुरुवात…

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) 2025-27 सायकलसाठी भारतीय संघ पुन्हा सज्ज झाला आहे. यंदाची मोहीम थेट इंग्लंडसारख्या बलाढ्य संघाविरुद्ध सुरू होणार आहे, आणि त्यानंतर भारतीय संघ वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेसारख्या संघांविरुद्धही कसोटी मालिका खेळणार आहे. बीसीसीआयने नुकतंच भारताच्या कसोटी मालिकांचे वेळापत्रक जाहीर केलं आहे.

2025-27 च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये कोणते संघ खेळतील?

आयसीसी रँकिंगच्या आधारे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी संघ पात्र ठरतात. सध्याच्या रँकिंगच्या आधारे, भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, श्रीलंका, वेस्ट इंडिज, पाकिस्तान आणि बांगलादेश 2025-27 च्या वर्ल्ड कपसाठी पात्र ठरले आहेत. एकदिवसीय आणि टी-20 मधील संघ क्रमवारीबद्दल बोलायचे झाले तर, भारत सध्या दोन्ही फॉरमॅटमध्ये नंबर-1 संघ आहे.

हे ही वाचा –

बीसीसीआयची गंगाजळी आटली? कर्मचाऱ्यांच्या ‘दैनंदिन भत्त्या’वर कात्री, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

आणखी वाचा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.