डेगवे ''स्थापेश्वर'' मंचतर्फे
शाळांमध्ये वह्या वाटप
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १५ : विशिष्ट प्रकारच्या वह्यांमुळे विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर वळणदार होते आणि लिखाणाला गती मिळते, हे जाणून श्री देव स्थापेश्वर विद्या विकास मंच, डेगवेच्या वतीने खास वह्या छापून घेत त्यांचे विनामूल्य वाटप करण्यात आले. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या सुरुवातीला डेगवे पंचक्रोशीतील दहा प्राथमिक शाळांना विनामूल्य वह्या वाटप करण्यात आले. यामध्ये डेगवे शाळा क्रमांक १, मोयझर, मिरेखण, आंबेखन, पडवे धनगरवाडी, पडवे माजगाव, मोरगाव, गावठाण, आडाळी, डिंगणे या शाळांना आज प्रभाकर तेली यांच्या उपस्थितीत प्रतिनिधींमार्फत वह्या वाटप केले. माध्यमिक विद्यालय डेगवे प्रशालेला उद्या (ता. १६) वह्या सुपूर्द केल्या जातील. डेगवे प्रशालेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्वतोपरी सहाय्य आणि मार्गदर्शन करण्यासाठी स्थापेश्वर विद्या विकास मंच प्रयत्नशील असून, भविष्यात विद्यार्थ्यासाठी अनेक उपक्रम राबविण्यात येतील, असे श्री. तेली यांनी सांगितले.