कऱ्हाड : हिंदकेसरी संतोष वेताळ यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे पक्षाच्या बाहुतील बळ वाढले आहे. क्रीडा क्षेत्राबद्दल त्यांच्या मनातील तळमळ पाहता भविष्यात खेळाडूंच्या हितासाठी पैलवान संतोष वेताळ यांना राज्यस्तरावरील मोठी जबाबदारी देण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
ठाणे येथे झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत हिंदकेसरी संतोष वेताळ यांनी शिवसेनेचा भगवा ध्वज हाती घेतला. या वेळी उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार धैर्यशील माने, आमदार सुहास बाबर, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, अभिनेत्री दीपाली सय्यद, उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव, रणजित पाटील, शिवसेनेचे सरचिटणीस राम रेपाळे, सुनील मोरे, सातारा जिल्हा संपर्क प्रमुख नगरसेवक शरद कणसे, कुस्तीसम्राट अस्लम काझी, गौरव नायकवडी आदी उपस्थित होते. या वेळी सुर्लीचे उपसरपंच कृष्णात मदने, अमोल भोगे, सुनील पाटील यांच्यासह हजारो पैलवानांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
या वेळी उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘‘कुस्ती हा मराठमोळा मर्दानी खेळ महाराष्ट्राचे वैभव आहे. ते आपण जपले पाहिजे. संतोष वेताळ जिल्ह्यातील पहिले हिंदकेसरी झाले याचा अभिमान आहे. चंद्रहार पाटील, संतोष वेताळ आता शिवसेनेच्या खऱ्या आखाड्यात आले आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील तालमींच्या, पैलवानांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्यावा, शिवसेनेची ताकद त्यांच्या मागे उभी करू.’’
उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार सुहास बाबर, चंद्रहार पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.काम करेल तो पुढे जाईल. शिवसेना सामन्यांचा पक्ष आहे इथं कोण मालक, नोकर नाही. आपण सर्व कार्यकर्ते आहोत. जो काम करेल तोच पुढे जाईल. त्यामुळे तळागाळापर्यंत जाऊन पक्ष मजबूत करण्यासाठी काम करा, असे आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केले.