कोल्हापूर : कोल्हापूरच्या क्रीडा प्रबोधिनीत कुस्तीचा कोटा २० अन् पैलवान मात्र आठ, अशी स्थिती झाली आहे. प्रबोधिनीसाठी एकूण १७ पैलवानांची निवड झाली होती. त्यातील १० जण प्रबोधिनीकडे फिरकलेच नाहीत. नेमबाजीचा कोटा २० असून, केवळ एकच खेळाडू नेमबाजीचे धडे गिरवत आहे.
राज्यातील नावाजलेल्या क्रीडा प्रबोधिनीपैकी एक कोल्हापूरची क्रीडा प्रबोधिनी आहे. ती १९९६-९७ ला सुरू झाली. कुस्तीसाठी आठ ते चौदा वयोगटातील मुलांची प्रत्यक्ष मैदानावर चाचणी घेऊन निवड केली जाते. गतवर्षी ही चाचणी एप्रिलमध्ये झाली. ऑगस्टमध्ये अंतिम यादी प्रसिद्ध होऊन ऑक्टोबरमध्ये १७ पैलवानांना इथल्या क्रीडा प्रबोधिनीत स्थान मिळाले.
त्यातील सात जणांनी तत्परतेने प्रवेश घेऊन प्रशिक्षक कृष्णात पाटील यांच्याकडे सरावाला सुरुवातही केली. एक पैलवान तीन वर्षांपासून प्रबोधिनीत असल्याने ही संख्या आठ झाली. उर्वरित १० जणांनी मात्र प्रबोधिनीकडे पाठ फिरवली. त्या पैलवानांशी जिल्हा क्रीडा कार्यालयाने पत्रव्यवहारही केला. त्यांच्याकडून काहीच उत्तर आले नाही.
आंतरराष्ट्रीय नेमबाज तेजस्विनी सावंत, राही सरनोबत, राधिका बराले, नवनाथ फरताडे, फुलचंद बांगर, संदीप तरटे यांनी त्यांच्या कौशल्याने क्रीडा प्रबोधिनीचे नाव उंचावले. त्यामुळे नेमबाजीकडे वळणाऱ्यांचा टक्काही वाढला. ज्या प्रबोधिनीतून ते घडले, त्या प्रबोधिनीतील नेमबाजांचा कोटा २० असूनही केवळ एकच नेमबाज निवासी आहे. नेमबाजीसाठी दोघांची निवड झाली होती. शाळेच्या कारणास्तव एकाला त्याच्या मागणीनुसार येथून अन्यत्र हलविण्यात आले.
प्रबोधिनीत अनेकांनी नाव कमावले
दिल्ली, हरियाणा, इंदूर इथल्या पैलवानांना राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या भूमीत येऊन कुस्तीचे धडे गिरवावेत, असे वाटते. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून प्रबोधिनीत प्रवेश घेऊन पैलवानांनी कुस्तीत आपले नाव कमावले. अमोल बुचडे, रेश्मा माने, संदीप बुचडे, रवींद्र लायकर, मोहन पोवाळकर, तानाजी शेंडगे, राजकुमार आगाव, विजय मालशिकारे, अवधूत कोरे, उत्कर्ष काळे, संदीप सावंत ही त्यापैकी काही नावे आहेत.
प्रबोधिनीत पैलवानांच्या जेवणाची, निवासाची व शिक्षणाची सोय उपलब्ध आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी त्यांना आवश्यक मार्गदर्शन केले जाते. त्यांच्या आहार, व्यायामाकडे प्रशिक्षकांचे लक्ष असते. निवड झाल्यानंतर पैलवानांनी प्रबोधिनीत प्रवेश घ्यायला हवा; अन्यथा त्यात नुकसान त्यांचेच आहे.
- सचिन चव्हाण, तालुका क्रीडाधिकारी व प्राचार्य, क्रीडा प्रबोधिनी