Accident News : टायर अचानक फुटलं, गाडीचं नियंत्रण सुटल्यानं वाहन तीनवेळा पलटी; मंत्री संजय राठोड यांच्या ताफ्यातील पोलीस गाडीचा अपघात
Saam TV June 16, 2025 04:45 AM

अक्षय गवळी, साम टिव्ही

अकोला : राज्यात दिवसेंदिवस अपघातांचं प्रमाण वाढत चाललं आहे. पण राज्याच्या मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांचा देखील अपघात होत असल्याचं आता समोर आलं आहे. शिवसेनेचे आमदार तथा मंत्री संजय राठोड यांच्या ताफ्यातील नागपूर पोलिसांच्या वाहनाचा भीषण अपघात झालाय. अकोल्यातील बोरगाव मंजूजवळ हा अपघात झाला. अपघातात चार पोलीस शिपाई जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, यात पोलिसांच्या वाहनाने तब्बल तीनवेळ पलटी घेतली.

जखमी पोलीस शिपायांवर अकोल्याच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात पोलिसांच्या गाडीच्या समोरील डाव्या बाजूचा टायर फुटल्याने झाला आहे. या अपघातात वाहनाचं वरील छप्पर पूर्णपणे दबलं गेलंय. अपघातात चार शिपाई जखमी झाले आहेत. अनिल ओंकार मडपाचे, फहीम खान असलम खान, फ्रफुल वाळके आणि अनिल मडपाचे असं जखमी झालेल्या पोलिसांची नावं आहेत. जखमी पोलिसांच्या भेटीसाठी अकोला जिल्हा रुग्णालयात येणार असल्याची प्राथमिक माहिती देखील समोर आली आहे. दरम्यान, जखमींमध्ये एका व्यक्तीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तर काही पोलिसांच्या पाठीवर आणि इतर ठिकाणी मुक्कामार लागलाय.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.