शेंदूरवादा : विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचा शेंदूरवादा (ता.गंगापूर, जिल्हा. छत्रपती संभाजीनगर)भागातील दौरा सबंधित कृषी केंद्र चालकांच्या चांगलाच अंगलट आला आहे. चौकशी पथकाने त्या-त्या दुकानाची तपासणी करून सुनावणीअंती जिल्हा कृषी विभागाने शनिवार (ता.14) छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक कृषी सेवा केंद्रचालकाचा परवाना कायमस्वरूपी रद्द केला, तर अन्य एकाचा परवाना ३१ मार्चपर्यंत आणि अन्य आठ दुकानांचे परवाने ९० दिवसांसाठी निलंबित केल्याने कृषी सेवा केंद्र चालकात खळबळ उडाली आहे.
खरीप हंगामासाठी शेतकरी बाजारात बियाणे, खते आणि कीटकनाशक खरेदीसाठी येत आहेत. शासनाने सरकी बियाण्यांचे दर निश्चित केले. यापेक्षा अधिक दराने बियाणे विक्री करू नये, असे निर्देश आहेत. असे असताना जिल्ह्यातील विविध कृषी सेवा केंद्रावर सरकी बियाणे जादा दराने विक्री करत असल्याचे भरारी पथकाला आढळून आले. यात गंगापूर तालुक्यातील वैभव मशिनरी या दुकानाचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचे आदेश जिल्हा कृषी अधीक्षकांनी दिले. चिंतामणी सीइसचा परवाना ३१ मार्च २०२६ पर्यंत निलंबित केला. तर दहेगाव बंगला येथील अनुदानित खते लिंकिंग करून विक्री करताना किसान एजन्सी, मेहराज एजन्सी, उत्कर्ष कृषी सेवा केंद्र, हरिओम कृषी सेवा केंद्र आणि सद्गुरु कृषी सेवा केंद्रचालक आढळून आले. या दुकानांचे परवाने ९० दिवस निलंबित करण्यात आले आहे.
वैभव मशिनरीजवर याही वर्षी कडक कारवाई...गंगापूर येथील वैभव मशिनरीज या कृषी सेवा केंद्रचालकास गेल्या वर्षी जादा दराने सरकी बियाणे विक्री करताना पकडण्यात आले होते. यंदाही त्यांनी जादा दराने बियाणे विक्री केल्याचे निदर्शनास आल्याने त्यांचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचा निर्णय जिल्हा कृषी अधीक्षक यांनी घेतला.
निलबंन केलेले कृषी सेवा केंद्र पुढीलप्रमाणे....1)किसान एजन्सीज दहेगाव बंगला, (ता.गंगापूर) 90 दिवस.
2)मेहराज एजन्सीज दहेगाव बंगला (ता.गंगापूर) 90 दिवस
3)हरीओम कृषी सेवा केंद्र दहेगाव बंगला (ता.गंगापूर) 90 दिवस.
4)उत्कर्ष कृषी सेवा दहेगाव बंगला (ता.गंगापूर) 90 दिवस.
5)सदगुरू कृषी सेवा केंद्र दहेगाव बंगला (ता.गंगापूर) 90 दिवस.
6)वैभव मशीनरी गंगापूर बियाणे दुकान कायमचे रद्द
7)महाराष्ट्र अॅग्रो खंडाळा,(ता.वैजापूर ) 90 दिवस.
8)ओम अॅग्रो लोहगाव (ता.पैठण)30 दिवस.
9)अरिहंत अॅग्रो लासुरस्टेशन (ता.गंगापूर)30
10)चिंतामणी सीडस पैठण, 31 मार्च 2026 पर्यत.
सध्या खरीप हंगामाची पेरणी सुरू असल्याने शेतकऱ्यांकडून एकाच वाणाच्या मागणीला कृषी सेवा केंद्र चालकाकडून चढ्या दराने विकणे, खतामध्ये लिंकिंग करणे, या प्रकाराची भारी पथकाकडून तपासणी सुरू असून दोषी दहा कृषी सेवा केंद्र चालकावर कार्यवाही करण्यात आली असून यापुढेही ही कार्यवाही सुरू राहणार आहे.
-- प्रकाश देशमुख (जिल्हा कृषी अधिक्षक)