महाराष्ट्र प्रीमियर लीग २०२५ स्पर्धा सध्या पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, गहुंजे येथे सुरू आहे. या स्पर्धेत रविवारी कोल्हापूर टस्कर्स विरुद्ध रायगड रॉयल्स संघात खेळवला जाणार आहे. हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला.
शेवटच्या चेंडूवर नेतृत्वातील कोल्हापूर टस्कर्सने २ विकेट्सने रोमांचक विजय मिळवला. त्रिपाठी विजयाचा हिरोही ठरला. त्याने फलंदाजीतच नाही, तर क्षेत्ररक्षणातही मोलाचे योगदान दिले.
या सामन्यात रायगडच्या संघाला १९.४ षटकातच १५९ धावांवर कोल्हापूरने रोखले होते. तरी निरज जोशीने ४९ धावांची खेळी केली, तर विकी ओत्सवालने २२ आणि सिद्धेश वीरने २१ धावा केल्या. कोल्हापूरकडून आनंद ठेंगे आणि दीपर डांगी यांनी अफलातून गोलंदाजी करताना अनुक्रमे ४ आणि ३ विकेट्स घेतल्या. दरम्यान, गोलंदाजांच्या प्रयत्नांना क्षेत्ररक्षकांचीही साथ मिळाली.
कर्णधार राहुल त्रिपाठीने या सामन्यात तीन झेल घेतले. त्याने विकी ओत्सवाल, सागर जाधव आणि रवींद्र जाधव यांचे झेल घेतले. यातील एक झेल तर त्याने अफलातून घेतला, ज्याचे सध्या कौतुक होत आहे. त्याच्या या झेलाचा व्हायरल झाला आहे.
या व्हिडिओमध्ये दिसते की रायगड रॉयल्सच्या फलंदाजाने मोठा फटका खेळल्यानंतर राहुल त्रिपाठी मागे पळत गेला आणि त्याने हवेत सूर मारत दोन्ही हातांनी झेल घेतला. त्याचा हा झेल यंदाच्या स्पर्धेत सर्वोत्तम झेलांपैकी एक ठरला.
दरम्यान, या सामन्यात रायगडने कोल्हापूरसमोर १६० धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना कोल्हापूरने आक्रमक सुरुवात केली पण पहिल्या ६ षटकात त्यांनी सचिन धस (२९), अंकित बावणे (१५) आणि सिद्धार्थ म्हात्रे (०) यांच्या विकेट्स गमावल्या. त्यानंतरही त्यांनी नियमित अंतराने विकेट्स गमावल्या होत्या.
पण एका बाजूने कर्णधार राहुल त्रिपाठी खंबीरपणे खेळत होता. त्याला मध्ये ५ व्या विकेटसाठी विशांत मोरेने साथ दिली. पण तोही १८ व्या षटकात २२ धावा करून बाद झाला. राहुल त्रिपाठीही ७ चेंडूत ६ धावांची गरज असताना बाद झाला. त्याने ४३ चेंडूत ५ चौकारांसह ५३ धावा केल्या.
त्यानंतरही निखील कदमने शेवटचे षटक चांगले टाकले होते. त्याने चौथ्या चेंडूवर आनंद ठेंगेला २ धावांवर बादही केले. त्यामुळे २ चेंडूत ३ धावा असे समीकरण होते. अखेर धनराज शिंदेने कोल्हापूरच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. कोल्हापूरने २० षटकात ८ बाद १६२ धावा केल्या.
रायगडकडून तनय संघवीने शानदार गोलंदाजी करताना ३ विकेट्स घेतल्या. निखील कदमने २ विकेट्स घेतल्या, तर विकी ओत्सवालने १ विकेट घेतली.