जुन्नर - नाणेघाटाजवळील बाराशे फूट खोल दरीत अंजनावळे (लव्हाळी) ता.जुन्नर येथील नवनाथ रामदास कोकणे (वय-२७) ह्या बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे.
मृत नवनाथ रविवारी ता. १५ रोजी दुपार पासून नाणेघाट येथून बेपत्ता होता. त्याचा शोध घेण्यात येत होता. येथील सुमारे बाराशे फूट खोल दरीत (सोमवारी ता. १६) मृतदेह मिळून आला. जुन्नर येथील शिवजन्मभूमी रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी मृतदेह वर आणण्याचा प्रयत्न केला.
परंतु जोराचा पाऊस, दाट धुके, वादळी हवा तसेच अंधार पडल्याने शक्य झाले नाही. खोल दरीतून मृतदेह स्ट्रेचरवर ठेऊन सुमारे ६०० फूटावर सपाट जागी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास आणून ठेवण्यात आला. रेस्क्यू टीम तसेच स्थानिक ग्रामस्थांनी आज मंगळवार ता. १७ रोजी मृतदेह दरीतून वर आणला.
यासाठी शिवजन्मभूमी जुन्नर रेस्क्यू टीमचे सदस्य रुपेश जगताप, राजकुमार चव्हाण, आदित्य आचार्य, ओम बिडवई, सुजल बिडवई, संकेत बोंबले, संकेत कबाडी, अकबर शेख, संदीप पारधी, कपिल कबाडी, बाळू मेमाने, सदानंद मानकर, दिनेश पापडे, हर्ष जगताप, शुभम सरजिने, मगदूम सय्यद आदींचे सहकार्य झाले.
दरम्यान नवनाथ याचा अपघात की आत्महत्या याबाबत पोलीस तपास करत आहेत.