Entertainment News : हॉलिवूडमधील दमदार अॅक्शन स्टार लियाम नीसन आणि ९० च्या दशकातील ग्लॅमरस आयकॉन्सपैकी एक असलेली अभिनेत्री पामेला अँडरसन एकत्र स्क्रीन शेअर करत आहेत – हीच बातमी सध्या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे. त्यांच्या आगामी विनोदी चित्रपट ‘द नेक्ड गन’चा धमाल ट्रेलर नुकताच पॅरामाऊंट पिक्चर्स इंडियाने प्रदर्शित केला आहे.
चित्रपटात लियाम नीसन हे लेफ्टनंट फ्रँक ड्रेबिन ज्युनियर या पात्रात दिसणार आहेत. त्यांच्या खास शैलीतील गंभीर चेहऱ्यावरील भाव आणि हास्यस्फोटक परिस्थितीतील प्रतिक्रिया ही या चित्रपटाची मुख्य जमेची बाजू ठरत आहे. त्यांना साथ देताना पामेला अँडरसन एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार असून, ती अॅक्शन आणि विनोद यांचे जबरदस्त मिश्रण प्रेक्षकांसमोर घेऊन येते.
‘सॅटर्डे नाईट लाईव्ह’ आणि ‘पॉपस्टार : नेव्हर स्टॉप नेव्हर स्टॉपिंग’ यांसारख्या विनोदी प्रोजेक्ट्ससाठी प्रसिद्ध असलेले दिग्दर्शक अकिवा शाफर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
लियाम आणि पामेला या जोडीसोबतच पॉल वॉल्टर हॉझर, सीसीएच पॉउंडर, केविन ड्युरँड, कोडी रोड्स, लायझा कोशी, एडी यू आणि डॅनी हस्टन हे कलाकार देखील लक्षवेधी भूमिकांमध्ये आहेत.
सेठ मॅकफारलेन आणि एरिका हगिन्स यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून, पटकथा डॅन ग्रेगर, डग मँड आणि अकिवा शाफर यांनी लिहिली आहे.
‘द नेक्ड गन’ भारतात येत्या १ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षकांना हास्याचा भरघोस डोस देणारा आणि एक वेगळा लियाम नीसन दाखवणारा हा चित्रपट यंदाच्या हंगामात नक्कीच गाजणार, अशी जोरदार चर्चा रंगली आहे.