मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर ८ गाड्यांचा विचित्र अपघात, कैद्यांना घेऊन जाणाऱ्या वाहनाला जबर धडक
Saam TV June 19, 2025 12:45 AM

विकास मिरगणे, नवी मुंबई प्रतिनिधी

Mumbai Pune Expressway Accident : एक्सप्रेस वेवर ७ ते ८ वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर भातान बोगद्यात ८ गाड्यांची एकमेकांना जोरदार धडक झाली. अपघातानंतर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. अपघातामध्ये कैद्यांना घेऊन जाणारी पोलिसांची गाडीही होती. या अपघातात १० ते १२ पोलीस गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पनवेलमधील रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

एक्सप्रेस हायवेवर भातान बोगद्यात मंगळवारी रात्री सात ते आठ वाहनांचा विचित्र अपघात घडला. या अपघातात पाच ते सहा पोलिसांच्या पिंजरा गाड्या, एक महामंडळाची बस, एक टेम्पो, एक पोलिस स्कॉर्पिओ आणि जीप यांचा समावेश आहे. पुणे लेनवर घडलेल्या या अपघातात सर्व वाहने एकमेकांवर आदळली. हा ताफा मुंबईहून पुण्याकडे बांगलादेशी कैद्यांना घेऊन जात होता. सुदैवाने, या अपघातात कोणताही कैदी जखमी झाला नाही. मात्र, गाड्या चालवणारे १० ते १२ पोलिस चालक जखमी झाले असून, त्यांना तातडीने पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर आहे. (Prisoner Transport Van Hit in Multi-Vehicle Crash on Expressway)

अपघातामुळे काही तासांसाठी वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी तातडीने बचावकार्य सुरू करून रस्ता मोकळा केला. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक माहितीनुसार, वेग आणि नियंत्रण सुटणे यामुळे हा अपघात घडल्याचा संशय आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, प्रत्यक्षदर्शी आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अधिक माहिती गोळा केली जात आहे.

भिवंडी-कल्याण मार्गावर कंटेनर पलटल्याने चालकाचा मृत्यू

भिवंडी-कल्याण मार्गावर मंगळवारी कंटेनर पलटल्याने झालेल्या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला. मयत चालकाचे नाव राम लखन चव्हाण (वय ४८, शहापूर) असे आहे. तो भिवंडीकडे येत असताना हा अपघात घडला. कंटेनर रिव्हर्स घेताना मागील बाजू उंच असल्याने वाहन कलंडले आणि पलटले. या अपघातामुळे चालकाचा मृत्यू झाला.

अपघाताने भिवंडी-कल्याण मार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली. घटनास्थळी शांतीनगर पोलिस आणि वाहतूक पोलिसांनी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी अधिक तपास सुरू आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.