Ashadhi Wari : पालखी सोहळ्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज; आठ हजार पोलिस तैनात
esakal June 19, 2025 04:45 AM

पुणे - आषाढी वारी पालखी सोहळ्यानिमित्त येत्या २० जून ते २३ जून या कालावधीत संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालख्या पुणे शहरातून मार्गक्रमण करतील. या पालखी सोहळ्यादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी सुमारे आठ हजार पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

पोलिस आयुक्त कार्यालयात बुधवारी (ता. १८) आयोजित या पत्रकार परिषदेस पोलिस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त पंकज देशमुख, वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे उपस्थित होते.

शहरात २० जूनला पालख्यांचे आगमन -

संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी २० जून रोजी बोपखेल येथे आगमन झाल्यानंतर फुलेनगर, संगमवाडीमार्गे श्री भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिर येथे मुक्कामी थांबेल.त्याच दिवशी तुकाराम महाराजांची पालखी हॅरिस ब्रिज खडकी येथून आगमन होऊन तुकाराम पादुका चौकमार्गे नाना पेठेतील श्री निवडुंग्या विठोबा मंदिर येथे मुक्कामी पोहोचेल. दोन्ही पालख्या २१ जून रोजी पुणे शहरात मुक्कामी राहतील.

प्रस्थान आणि पुढील मुक्काम -

संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी २२ जून रोजी मुक्कामाच्या ठिकाणाहून निघून हडपसर गाडीतळ, उरुळी देवाची, वडकीनाला येथे विसावून दिवे घाटमार्गे सासवड (पुणे ग्रामीण हद्द) येथे मुक्कामी जाईल. त्याच दिवशी तुकाराम महाराजांची पालखी मुक्कामाच्या ठिकाणाहून हडपसर गाडीतळ, कदमवाक वस्ती मार्गे लोणी काळभोर येथे मुक्कामी पोहोचेल. २३ जून रोजी तुकाराम महाराजांची पालखी नायगाव फाटा मार्गे यवत येथे प्रस्थान करेल.

बंदोबस्ताची चोख तयारी -

वारकऱ्यांमध्ये महिला व लहान मुलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असतो. कोठेही घातपाताची घटना होणार नाही, चेंगराचेंगरी होणार नाही आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात केला आहे.

- घातपात टाळण्यासाठी बीडीडीएस आणि श्वान पथकांमार्फत तपासणी.

- गर्दीच्या ठिकाणी जलद प्रतिसाद पथके (क्यूआरटी) तैनात.

- चेन स्नॅचिंग, पिक पॉकेटींगच्या घटना टाळण्यासाठी गुन्हे शाखेच्या विशेष पथकांची नियुक्ती.

- पालख्यांची लाइव्ह लोकेशन लिंक वेबपेज व समाजमाध्यमांवर उपलब्ध.

- वाहतुकीच्या बदलाची माहिती सोशल मीडियावर.

- पालखी मार्ग, विसावा व मुक्काम स्थळी मदत केंद्रे आणि सीसीटीव्ही यंत्रणा.

- गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी बॅरिकेडिंग

नियोजनबद्ध समन्वय -

पालखी सोहळा सुरक्षित पार पाडण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण, महापालिका, मेट्रो, अग्निशामक दल यांच्यासह समन्वय बैठक घेण्यात आली आहे. तसेच, पालखी सोहळा प्रमुख आणि विश्वस्तांसमवेत बैठक घेऊन तयारी करण्यात आली आहे.

असा राहील पोलिस बंदोबस्त -

अतिरिक्त आयुक्त- ४

पोलिस उपायुक्त - १०

सहाय्यक आयुक्त- २०

पोलिस निरीक्षक- १२८

सहाय्यक निरीक्षक आणि उपनिरीक्षक- ५१३

पोलिस अंमलदार- ६१४३

एसआरपीएफ- एक कंपनी

होमगार्ड- १२४०

क्यूआरटी- १२

बीडीडीएस- सहा पथके.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.