Khadakwasla Dam : खडकवासला धरण साखळीतील चारही धरणांमध्ये ६.९७ टीएमसी पाणीसाठा
esakal June 19, 2025 07:45 AM

खडकवासला - खडकवासला धरण साखळीतील चारही धरणांमध्ये आज बुधवार (दि. १८ जून) रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत एकूण ६.९७ टीएमसी म्हणजे २३.९१ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. गतवर्षी याच दिवशी साठा फक्त ३.६६ टीएमसी म्हणजे १२.५७ टक्के इतका होता. म्हणजेच यंदा धरणांमध्ये दुपटीने अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे.

चारही धरणांमध्ये मिळून २४६ दशलक्ष घनफूट पाण्याची एकूण आवक झाली आहे. चारही धरण परिसरात सुरुवातीच्या टप्प्यात समाधानकारक पाऊस पडत आहे. पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होताना दिसत आहे.

खडकवासला धरणात आज दोन मिलिमीटर पाऊस झाला असून आतापर्यंतचा एकूण २०७ मिलिमीटर पाऊस झाला आहे. येथे सध्या १.२४ टीएमसी म्हणजे ६२.९२टक्के पाणीसाठा असून २८ दशलक्ष घनफूट पाण्याची आवकधरण साठ्यात आवक झाली आहे.

पानशेत धरणात आज १९ मिलिमीटर पाऊस झाला असून एकूण पर्जन्यमान २९७ मिलिमीटर झाले आहे. येथे २.०० टीएमसी म्हणजे १८.७९ टक्के पाणीसाठा आहे. ९४ दशलक्ष घनफूट पाण्याची धरण साठ्यात आवक झाली आहे.

वरसगाव धरणात आज १६ मिलिमीटर व एकूण ३०८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. येथे ३.४९ टीएमसी म्हणजे २७.३२ टक्के साठा असून ९१ दशलक्ष घनफूट पाण्याची धरण साठ्यात आवक झाली आहे.

टेमघर धरणात १८ मिलिमीटर आजचा व एकूण ३६६ मिलिमीटर पाऊस झाला आहे. येथे सध्या ०.२४ टीएमसी म्हणजे ६.३५ टक्के साठा असून ३३ दशलक्ष घनफूट पाण्याची धरण साठ्यात आवक झाली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.