नाशिक- नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे २०२६-२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीस वेग देत, विभागीय आयुक्त व सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांनी यंत्रणांना स्पष्ट सूचना दिल्या. आतापर्यंत जाहीर करण्यात आलेल्या ४ हजार कोटींच्या निविदा तातडीने अंतिम करून कार्यारंभ आदेश द्यावेत, तसेच प्रगतिपथावर असलेल्या २ हजार कोटींच्या निविदा लवकरात लवकर निर्गमित कराव्यात, असे त्यांनी बैठकीत सांगितले.
मंगळवारी (ता. १७) विभागीय आयुक्त कार्यालयात सिंहस्थ प्राधिकरणाची पहिली बैठक झाली. यामध्ये जिल्हाधिकारी जलज शर्मा, आयुक्त संदीप कर्णिक, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, तसेच इतर वरिष्ठ अधिकारी आणि प्राधिकरणातील सदस्य सहभागी झाले होते. डॉ. गेडाम यांनी सांगितले की, सर्व विभागांनी प्राधान्यक्रम ठरवून प्रस्ताव सादर करावेत, तसेच तांत्रिक मान्यता पूर्ण करून अंतिम मंजुरीसाठी सादरीकरण करावे, असे त्यांनी नमूद केले.
स्वतंत्र कार्यालय, साप्ताहिक आढावा
प्राधिकरणाचे स्वतंत्र कार्यालय लवकरच सुरु होणार असून, मुख्य इमारतीत जागा निश्चित करण्यासाठी तपासणी सुरू आहे. ही जबाबदारी अतिरिक्त आयुक्त करिष्मा नायर यांच्यावर सोपविण्यात आली आहे. दरम्यान, दर आठवड्याला विभागनिहाय आढावा बैठक घेतली जाणार असून, नियोजन व अंमलबजावणीसोबत गुणवत्तेवर भर दिला जाणार असल्याची माहितीही डॉ. गेडाम यांनी दिली.