गिल-जैस्वालने रंगवला दिवस, तर पंतसमोर साहेबांची लाचारी; लीड्स कसोटीच्या पहिल्या दिवशी काय काय घ
Marathi June 21, 2025 02:24 AM

इंग्लंड विरुद्ध इंडिया पहिला कसोटी दिवस -1: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेची भव्य सुरुवात झाली असून, पहिल्या सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय फलंदाजांनी जबरदस्त कामगिरी करत सामन्यावर आपली पकड मजबूत केली. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला, मात्र भारतीय सलामीवीरांनी त्यांचा हा निर्णय पुरता चुकीचा ठरवला.

गिल-जैस्वालने रंगवला दिवस, तर पंतसमोर साहेबांची लाचारी…

कर्णधारपदाची धुरा पहिल्यांदाच सांभाळणाऱ्या शुभमन गिलने जबाबदारीचं सोनं केलं. दुसऱ्या बाजूला, सलामीला उतरलेल्या यशस्वी जायसवालने इंग्लंडच्या गोलंदाजांना दमवून टाकलं. या दोघांनी तडाखेबाज खेळी करत शानदार शतकी भागीदारी रचली. गिलने आपली संयम कामगिरीत जबरदस्त शतक झळकावलं. त्याचप्रमाणे जैस्वालनेही संयम आणि आक्रमकतेचा मेळ साधत आपल्या कसोटी कारकिर्दीत आणखी एक शतक जोडलं. यासोबत उपकर्णधार ऋषभ पंतने आक्रमक खेळ करत आपलं अर्धशतक साजरं केलं. त्याच्या फटकेबाजीतून भारताने डावाच्या अखेरपर्यंत धावसंख्येला भक्कम आकार दिला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला, तेव्हा भारताने 359 धावा केल्या आणि फक्त तीन विकेट्स गमावल्या होत्या.

लीड्स कसोटीच्या पहिल्या दिवशी काय काय घडलं?

इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. केएल राहुल आणि यशस्वी यांनी पहिल्या विकेटसाठी 91 धावांची भागीदारी केली. पण, त्यानंतर संघाला 2 धक्के बसले. साई सुदर्शन खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. 2 विकेट पडल्यानंतर, गिल आणि यशस्वी यांनी डावाची सूत्रे हाती घेतली आणि 129 धावांची भागीदारी केली. यानंतर, पंत आणि गिलमध्ये 138* धावांची भागीदारी झाली. इंग्लंडचे गोलंदाज दिवसभर काही खास करू शकले नाहीत. दिवसाचा खेळ संपेपर्यंत संघाने 359/3 धावा केल्या आहेत. ऋषभ पंत (65*) आणि शुभमन गिल (127*) क्रीजवर आहेत. यशस्वी जैस्वालने बाद होण्यापूर्वी 101 धावांची शानदार शतकी खेळी खेळली.

3 हजाराच्या क्लबमध्ये पंतची एन्ट्री!

पंतने इंग्लंडविरुद्ध लीड्स कसोटीत शानदार अर्धशतक झळकावून त्याच्या कसोटी कारकिर्दीत 3000 धावा पूर्ण केल्या. त्याने 44 कसोटींपैकी 76 व्या डावात हा टप्पा गाठला. पंतचे हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 15 वे अर्धशतक होते आणि इंग्लंडविरुद्धचे त्याचे चौथे शतक होते. विशेष म्हणजे यष्टिरक्षक फलंदाजांमध्ये, फक्त ऑस्ट्रेलियाच्या अॅडम गिलख्रिस्टने पंतपेक्षा 3000 धावा वेगवान केल्या आहेत, ज्याने केवळ 63 डावात हा आकडा गाठला.

आणखी वाचा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.