चाकण, ता. २१ : येथे चाकण- शिक्रापूर मार्गावर शनिवारी (ता. २१) सकाळी चाकण ते रासे फाटा या दरम्यान दहा अवजड वाहने बंद पडली. ही वाहने बाजूला करण्यासाठी मोठ्या दोन क्रेन आणाव्या लागल्या. त्यामुळे चाकण- तळेगाव, चाकण- शिक्रापूर या मार्गावर वाहनांच्या रांगा अगदी दहा किलोमीटरपर्यंत गेल्या होत्या. त्यामुळे नागरिक, कामगार वर्ग संतप्त झाला आहे.
याबाबत चाकण (ता. खेड) पोलिस ठाण्याचे वाहतूक विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश राठोड यांनी सांगितले की, चाकण- शिक्रापूर मार्गावर कंपनीच्या मालांची वाहतूक करणारी दहा अवजड वाहने बंद पडली. त्यामुळे ती वाहने दूर करण्यासाठी मोठा वेळ जात आहे. चाकण औद्योगिक वसाहतीमधील संघटना आहे. त्या संघटनांनी पोलिस विभागाला मदत करण्यासाठी क्रेन दिल्या पाहिजेत, परंतु त्या दिल्या जात नाही.
चाकण परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक विभागाचे पोलिस अधिकारी, कर्मचारी अपुरा वर्ग आहे. कंपनीच्या मालाची वाहतूक करणारी अवजड वाहने बंद पडल्यानंतर ती वाहने बाजूला घेण्यासाठी तत्काळ व्यवस्था नाही. त्यामुळे वाहतूक विभागाच्या पोलिसांना खासगी क्रेन बोलावून ही वाहने बाजूला करावी लागतात. रासे फाटा येथील अवजड ट्रेलर दोन क्रेनने बाजूला केला. त्यानंतर वाहतूक थोडीशी सुरळीत झाली, पण हे नित्याचे झाले आहे. त्यामुळे नेमके करायचे काय? असा सवाल पोलिस अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना पडतो आहे.
याबाबत सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब शिळवणे म्हणाले, ‘‘वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झालेली आहे. अगदी एका ठिकाणावर एका तासाच्या वर वाहने थांबत आहेत. त्यामुळे सामान्य वाहन चालक, शेतकरी, प्रवासी विद्यार्थी, उद्योजक, कामगार नागरिकांनी काय करायचे? प्रशासन झोपले आहे का?’’