Nitish Kumar : बिहारमध्ये सामाजिक सुरक्षा योजनेच्या पेन्शनमध्ये वाढ
esakal June 22, 2025 11:45 PM

पाटणा : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेले असताना राज्यातील नीतिशकुमार सरकारने विधवा, ज्येष्ठ आणि दिव्यांग नागरिकांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

यानुसार आता चारशे रुपयांऐवजी दरमहा ११०० रुपये पेन्शन मिळणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री नीतिशकुमार यांनी एक्सवर पोस्ट करत निर्णयाची माहिती दिली आहे. नवीन वाढ येत्या जुलै महिन्यांपासून लागू हेाणार आहे.

मुख्यमंत्री नीतिशकुमार यांनी राज्यातील ज्येष्ठांच्या पेन्शनमध्ये वाढ करताना आनंद होत असल्याचे नमूद केले आहे. नीतिशकुमार यांनी म्हटले, ‘‘राज्यात सामाजिक सुरक्षा पेन्शन योजनेनुसार राज्यातील सर्व ज्येष्ठ, दिव्यांग आणि विधवा महिलांना आता चारशे रुपयांऐवजी ११०० रुपये पेन्शन मिळणार आहे.

सर्व लाभार्थ्यांना जुलै महिन्यांपासून वाढीव पेन्शन मिळणार आहे. यानुसार लाभार्थ्यांच्या खात्यात ही रक्कम दरमहा दहा तारखेला जमा होईल. सरकारच्या निर्णयामुळे एक कोटी ९ लाख ६९ हजार २५५ लाभार्थ्यांना लाभ मिळेल.’’

Artificial Intelligence : आप्तस्वकीयांच्या ‘हॅलो’ला ‘एआय’कडून उत्तर! ब्रिटन, अमेरिकेतील इराणच्या नागरिकांना विचित्र अनुभव

मुख्यमंत्री नीतिशकुमार यांनी ज्येष्ठ नागरिक राज्यातील महत्त्वाचा घटक असून त्यांना सन्मानाने जीवन व्यतित करण्याचे सरकारचे प्राधान्य असून राज्य सरकार यादृष्टीने सातत्याने प्रयत्न करेल, असेही म्हटले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.