दिल्लीतील चांदनी चौकचा खरा इतिहास काय? जाणून घ्या कसं पडलं नाव?
GH News June 25, 2025 02:05 AM

दिल्ली म्हटलं की प्रत्येकाच्या मनात जे काही ठिकाण लगेच डोळ्यासमोर उभं राहतं, त्यामध्ये ‘चांदनी चौक’ हे नाव सर्वात पुढं असतं. राजधानीतील हा बाजार केवळ एक शॉपिंग डेस्टिनेशन नसून, एक ऐतिहासिक ठेवा देखील आहे. भारतातील सर्वात जुन्या आणि प्रसिद्ध बाजारांपैकी एक असलेला चांदनी चौक आजही लग्न, पारंपरिक समारंभ आणि विविध सांस्कृतिक प्रसंगी शॉपिंगसाठी लोकांचा आवडता ठिकाण आहे. पण कधी तुम्ही विचार केलाय की या बाजाराचं नाव ‘चांदनी चौक’ का ठेवलं गेलं?

चांदनी चौक कधी आणि कसा तयार झाला?

चांदनी चौकचा इतिहास १७व्या शतकातला आहे. जेव्हा मुघल सम्राट शाहजहान यांनी आपली राजधानी आग्राहून दिल्ली येथे हलवली, त्यावेळी त्यांनी ‘शाहजहानाबाद’ नावाचं शहर वसवलं आणि त्याचाच एक भाग म्हणून लाल किल्ल्याचं निर्माण केलं. याच काळात शाहजहान यांच्या लाडक्या मुलीचा म्हणजेच ‘जहानआरा बेगम’ यांचा खूप खास सहभाग होता.

जहानआरा खरेदीची मोठी शौकीन होती. तिला स्वतःसाठी आणि इतर महिलांसाठी एक सुंदर व भव्य बाजार हवा होता. त्यामुळे तिने स्वतः या बाजाराचा आराखडा तयार केला. १६५० च्या दशकात हे बांधकाम सुरू झालं आणि आज ज्याला आपण चांदनी चौक म्हणतो, तो बाजार उभारण्यात आला.

चांदनी चौक हे नाव कसं पडलं?

‘चांदनी चौक’ या नावामागे एक सुंदर दृश्य लपलेलं आहे. या बाजाराची रचना अर्धचंद्राकृती (semi-circular) स्वरूपाची होती आणि बाजाराच्या मधोमध एक तलाव होता. त्या तलावात चांदण्याच्या रात्री चंद्राचं प्रतिबिंब उमटत असे, ज्यामुळे पूर्ण बाजार चांदनीसारखा झळकत असे. याच रम्य आणि तेजस्वी दृश्यामुळे या बाजाराचं नाव ‘चांदनी चौक’ पडलं, असं इतिहास सांगतो.

बाजाराची आजची ओळख

चांदनी चौक आजही आपल्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वासह ओळखला जातो. इथं पारंपरिक वस्त्रं, दागदागिने, मसाले, इलेक्ट्रॉनिक्स, खाद्यपदार्थ आणि जुनी शिल्पकला यांचं अप्रतिम संगम पहायला मिळतो. विशेषतः लग्नाच्या खरेदीसाठी हा बाजार आजही देशभरातील लोकांचा आवडता आहे. त्याची गल्ली-बोळ, गजबजाट आणि चविष्ट स्ट्रीट फूड दिल्लीच्या संस्कृतीचं एक अविभाज्य अंग आहे.

ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन महत्त्व

चांदनी चौक केवळ खरेदीसाठी नव्हे, तर इतिहासप्रेमी आणि पर्यटकांसाठी देखील आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. यासोबतच लाल किल्ला, जामा मशीद, शीशगंज गुरुद्वारा, आणि अनेक ऐतिहासिक हवेल्या याच परिसरात आहेत जे पर्यटकांसाठी must visit places आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.