- सायली शिंदे, योगतज्ज्ञ
आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जूनला जगभर साजरा केला जातो. शाळा, महाविद्यालय, सरकारी कार्यालयं, खासगी संस्थांमध्ये मोठ्या उत्साहात योग कार्यक्रम होतात, संकल्प घेतले जातात; पण योग हा फक्त एक दिवस साजरा करण्याचा विषय नाही, तो आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग व्हायला हवा. कारण योग म्हणजे केवळ आसनं नव्हेत, तर शरीर, श्वास आणि मनाचं एकत्र संतुलन साधणारी एक जीवनशैली आहे.
योगाभ्यासाचे शारीरिक फायदे
दररोज योगाभ्यास केल्यास शरीरातील लवचिकता वाढते, पचनक्रिया सुधारते आणि हाडे व स्नायूंना बळकटी मिळते. अनेक स्त्रिया,तरुणींमध्ये आढळणारे पाठदुखी, मानदुखी, पाळीतील समस्या, पीसीओडी, थकवा यांसारख्या तक्रारी योगाने दूर होतात. रोज १०-१५ सूर्यनमस्कार केल्यास वजन संतुलित राहते, त्वचा निरोगी राहते आणि एक प्रकारची ऊर्जा दिवसभर अनुभवायला मिळते.
प्राणायामाचे मानसिक फायदे
आज प्रत्येकालाच तणाव, चिंता आणि एकाग्रतेचा अभाव भेडसावतो. अशा वेळी प्राणायाम म्हणजे श्वासावर लक्ष केंद्रित करत शरीर आणि मन शुद्ध करणारा उपाय ठरतो. दररोज केवळ १०-१५ मिनिटांचा प्राणायामदेखील मनाला शांतता देतो, झोप सुधारतो, आत्मविश्वास वाढतो. विशेषतः अनुलोम-विलोम, कपालभाती आणि भ्रामरी प्राणायाम हे मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी अत्यंत उपयुक्त आहेत.
दोन सोपी योगासने
भुजंगासन (सर्पासन) : पोटावर झोपा, दोन्ही हात कोपरांपासून दुमडून खांद्याजवळ ठेवा. श्वास घेत घेत हळूहळू मान आणि छाती वर उचला. नाभी जमिनीवरच राहील. काही सेकंद थांबा आणि श्वास सोडत परत या. फायदे : पाठीचा कणा लवचिक होतो, पचन सुधारते, पाठदुखी कमी होते.
वक्रासन (Twisting Pose) : पाय पुढे करून बसा. डावा पाय गुडघ्यात दुमडून उजव्या पायावर ठेवा. उजवा हात डाव्या गुडघ्यावर ठेवा आणि डावा हात मागे टेकवा. श्वास घेत शरीर डावीकडे वळवा. काही सेकंद थांबा आणि श्वास सोडून परत या. फायदे : पचनक्रिया सुधारते, कमरेचा लवचिकपणा वाढतो, पीसीओडी/पीसीओएस मध्ये उपयोगी.
२१ जूनला आपण सगळे एकत्र येतो, सूर्यनमस्कार करतो, उत्सव साजरा करतो - ते नक्कीच प्रेरणादायी आहे; पण खरा योग दिन दररोज असावा, कारण आरोग्य हे फक्त एखाद्या दिवशी साध्य होत नाही, ते सातत्याने टिकवलं जातं. रोजचा वीस-तीस मिनिटांचा योग, थोडा प्राणायाम आणि सकारात्मक विचार - एवढंच पुरेसं आहे निरोगी शरीर आणि आनंदी मनासाठी.
‘योग ही कृती नव्हे - ती एक स्थिती आहे.’ चला, आजपासून ही स्थिती आयुष्यभरासाठी आत्मसात करूया!