India vs England Test Series – विजयाच्या जबड्यातून…
Marathi June 26, 2025 09:24 AM

>> संजय खडे

अॅण्डरसन-तेंडुलकर चषकाच्या पहिल्या कसोटीचं सूप काल वाजलं. आम्ही या पराभवातून खूप काही शिकलो, असं नवकप्तान आणि प्रशिक्षक म्हणाले. आमचा संघ तरुण आहे, अनुभवाची कमतरता आहे इत्यादी कारणं तर पुढे झालीच आहेत. पण ही कारणं योग्य आहेत का? कसोटी सामना हरल्यामुळे नाही, तर सुनील गावसकर म्हणतात त्याप्रमाणे ‘विजयाच्या जबडय़ातून पराभव खेचून आणला’ असं वाटल्यामुळे हे अन् असे अनेक प्रश्न उभे राहत आहेत. लक्षात घेणं आवश्यक. राहुल (59 कसोटी), पंत (44 कसोटी), बुमरा (46 कसोटी), जाडेजा (81 कसोटी), सिराज (37 कसोटी), कप्तान गिल (33 कसोटी) खेळणाऱया फलंदाज अन् गोलंदाजांना कमअनुभवी म्हणता येईल का?

कप्तान नवा आहे हे मान्य, पण मग त्याच्याबरोबर सर्व मिळून 267 कसोटींचा अनुभव असणारे बाकीचे पाच खेळाडू काय करत होते? सर्वाधिक अनुभवी जडेजाने आणि बुमरा, राहुल, पंत, सिराज यांनी त्यांच्यातर्फे कप्तानाला काय दिलं? जडेजाने खेळपट्टीवरच्या भेगांचा किंवा बुटखुणांचा किती उपयोग केला? राहुलने स्वतःहून कप्तानाशी किती संवाद साधला? पंतने एक यष्टिरक्षक म्हणून सर्वच गोलंदाजांशी किती संवाद साधला? यष्टिरक्षक आणि फिरकी गोलंदाजांनी यापूर्वी अनेक यादगार स्टंपिंग साध्य केलेली आहेत. पण डकेट आणि स्टोक्स जडेजाला उलटा स्वीप मारून झाडत होते तेव्हा त्याला प्रत्युत्तर म्हणून कुठलेच आडाखे मांडताना पंत-जडेजा दिसले नाहीत!

प्रसिधने दोन्ही डावांत सहापेक्षा जास्त सरासरीने धावा लुटवल्या. मग बुमरा-सिराज यांनी त्याच्याबरोबरीने एका तंबूत बसून काय साधलं?

तसंच, जब्बार पटेलच्या ‘सामना’ चित्रपटामधल्या ‘मारुती कांबळेचं काय झालं’च्या धर्तीवर मला विचारायचं आहे की, शार्दुल ठाकूरचं काय झालं? त्याला कप्तानाने, बुमराने आणि सिराजने तंबूबाहेर का बसवलं? त्याला पुरेसा आत्मविश्वास दिला असेल असं वाटलंच नाही.

थोडसं बुमराबद्दलही… बुमरावर पडणारा ताण. बुमरा काही काळापूर्वी मोठय़ा दुखापतीमधून बाहेर आला. शस्त्रक्रिया झाली. त्याला जपून वापरलं पाहिजे. पूर्णपणे मान्य आहे. पण याचा मोठ्ठा बाऊ केला जातोय का? म्हणजे विकेट्स घेतल्या की तो जगातला सर्वोत्तम. त्याची धुलाई झाली की ‘त्याला जपून वापरा’. हे पटण्यासारखं नाही वाटत. दौऱयापूर्वीच तो पाचपैकी तीन किंवा तत्सम कसोटी खेळणार वगैरे त्याने म्हटलं! बुमरा क्रिकेटपेक्षा मोठा आहे का? हे जसं न पटण्यासारखं आहे तसंच हार्दिक पंडय़ाबद्दल. तोसुद्धा रणजी खेळणार नाही, मला वाटेल तेवढंच खेळणार इत्यादी बोलत असतो. खरं तर पंडय़ा कसोटी संघात असावा अशी वकिली मी करणार होतो; पण स्वतःच्या इच्छेनुसार, इच्छेएवढंच खेळणाऱयांना प्रोत्साहन देणं म्हणजे त्यांना क्रिकेटपेक्षा मोठ्ठं करण्यासारखं ठरणार नाही का?

आणखी एक प्रश्न. इंग्लंड संघाच्या फलंदाजांचा, गोलंदाजांचा हिंदुस्थानी व्यवस्थापनाने नक्कीच अभ्यास केला असेल. पण त्यांच्या बॅझबॉल संकल्पनेचा कुणी, किती अभ्यास केला होता? या संकल्पनेवर काल संजय मांजरेकरने प्रथम उघडपणे चर्चा केली, पण या संकल्पनेला आजपर्यंत कुणी गंभीरपणे का घेतलं नव्हतं!

आता दुसऱया एजबॅस्टनला होणाऱ्या कसोटीमध्ये कप्तान गिल टॉस जिंकल्यावर प्रथम फलंदाजी करणार की इंग्लिश व्यवस्थापनाच्या संकल्पनेला छेद देण्यासाठी प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेणार?

विषय क्षेत्ररक्षणाचा. नेमकं काय बिनसलंय? झेल सोडणाऱयांच्या यादीत यशस्वीबरोबर जडेजाचंही नाव आहे! झेल कुणी मुद्दाम सोडत नाही हे मान्य. एकाग्रता मोडली की झेल सुटतात. मग एकाग्रता का मोडली? अशा कुठल्या विचारांनी दोघांच्या मनात काहूर माजवलं होतं? मालिकेच्या पहिल्या कसोटीत? हे सारे प्रश्न अनाकलनीय आहेत!

अर्थात, आमच्या आशा आणि अपेक्षांनी गेंडय़ाचं कातडं पांघरलंय असं जरी तुम्हा खेळाडूंना वाटत असलं तरी आमचा तोरा आम्ही सोडलेला नाही. ध्यानात ठेवा, तुम्ही जिंकलात तर तुम्हाला सलाम करू. पूर्ण प्रयत्न करून हरलात तर साथ देऊ. फुका जीव सोडलात तर मात्र…

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.