नवी दिल्ली : ‘‘सर्वांना, अंतराळातून नमस्कार. माझ्या सहकारी अंतराळवीरांबरोबर येथे येऊन मला खूप आनंद झाला आहे. वा! काय प्रवास होता. प्रक्षेपण केंद्रावर मी कुपीत बसलो होतो तेव्हा माझ्या मनात एक विचार होता तो म्हणजे ‘चला आता जाऊ या!,’’ असे सांगत ‘ॲक्झिओम -४’ मोहिमेचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी गुरुवारी अंतराळातील अनुभव सांगितले.
फ्लोरिडा येथील केनेडी अवकाश केंद्रामधून ‘स्पेसएक्स’च्या फाल्कन ९ प्रक्षेपकाद्वारे प्रक्षेपित केलेल्या क्रू ड्रॅगन यानातून अंतराळ प्रवास करताना पहिल्या काही तासांतील सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाच्या स्वप्नवत अनुभवावर भाष्य केले.
आम्ही गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावातून बाहेर पडलो तेव्हा आधी मला खूप छान वगैरे वाटले नाही, अशी कबुली देतानाच मी कालपासून खूप झोपलो असल्याचे मला सांगण्यात आले. आता मी बाहेरील दृश्यांचा आनंद घेत, लहान मुलासारखा शिकत आहे, असेही शुक्ला म्हणाले.