केळकर महाविद्यालयात ड्रग्ज विरोधात जागृती
esakal June 28, 2025 01:45 AM

केळकर महाविद्यालयात
ड्रग्ज विरोधात जागृती
देवगड ः येथील स. ह. केळकर महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ सेवन व तस्करी विरोधी दिनानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे जनजागृतीपर कार्यक्रम घेतला. तरुणाईच्या भवितव्यासाठी असे उपक्रम उपयुक्त ठरतील, असे मत येथील पोलिस निरीक्षक भरत धुमाळ यांनी व्यक्त केले. श्री. धुमाळ यांनी, अमली पदार्थसेवनाचे दुष्परिणाम सांगितले. समस्येला तोंड देण्यासाठी तरुणांचा सहभाग, जागरूकता आणि सामाजिक जबाबदारीचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी अंमली पदार्थाच्या व्यसनाच्या मानसिक, शारीरिक आणि सामाजिक परिणामांवर लक्ष केंद्रित करणारा एक लघुपट दाखवला. या माहितीपटात महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे सादरीकरण दाखवले. प्रभारी प्राचार्य डॉ. विजयकुमार कुनुरे यांनी, ड्रग्जमुक्त कॅम्पस राखण्यासाठी महाविद्यालयाच्या वचनबद्धतेची पुष्टी केली. अंमली व मादक पदार्थाच्या व्यसनाचे परिणाम व्यक्तीच्या पलीकडे कुटुंबे आणि समाजावर मोठ्या प्रमाणात परिणाम करतात यावर भर दिला. उपप्राचार्य (प्रशासन) प्रा. श्रीकांत सिरसाठे यांनीही मनोगत व्यक्त केले. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी नीलेश वानखडे यांनी प्रास्ताविक केले.
...................................
वेंगुर्लेतील रस्त्यांची
खोदकामांमुळे दुर्दशा
वेंगुर्ले ः शहरात भूमिगत गॅस पाईप लाईन टाकण्याचे काम सुमारे चार वर्षापेक्षा अधिक काळ सुरू असून अद्याप एकही कनेक्शन दिलेले नाही. मात्र, या गॅस पाईप लाईनच्या नादात शहरातील सर्वच रस्ते खोदल्यामुळे ते खड्डेमय झालेत. त्यामुळे ही गॅस पाईप लाईन रस्त्यांची वाट लावण्यासाठीच आहे काय, असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्ते अॅड. मनिष सातार्डेकर यांनी केला आहे. या गॅस पाईप लाईनसाठी नगर पंचायततर्फे त्यांना भूखंडही उपलब्ध करून देण्यात आला होता. तरीही चार वर्षांत संबंधित कंपनीने एकही कनेक्शन दिलेले नाही. ही लाईन टाकण्यासाठी मात्र सर्वच रस्ते खोदून टाकले आहेत. या रस्त्यांची डागडुजीही केलेली नाही. कंपनीच्या कामावर नगर पंचायत प्रशासनाचा अंकुश नाही. त्यामुळे मनमानीपणे वाटेल, तसे रस्ते खोदले गेलेत. नगरपंचायतीने गंभीर दखल घेऊन संबंधित कंपनीला गॅस कनेक्शन सुरू करण्याच्या सूचना द्याव्यात, खोदलेले रस्ते पूर्ववत करावेत, अशी मागणीही त्यांनी केली.
.......................
आरोंदा येथे
सोमवारी नाटक
सावंतवाडी ः श्री देवी सातेरी भद्रकाली मंदिर, आरोंदा येथे सोमवारी (ता.३०) रात्री ७.३० वाजता ‘अहंकार दक्षाचा विवाह शिवशक्तीचा’ या संयुक्त दशावतार नाट्यमंडळाच्या नाट्यप्रयोगाचे आयोजन केले आहे. यात सहभागी कलाकारांमध्ये शंकर शेणई, सती - दत्तप्रसाद सुधीर तांडेल, - दक्ष मोरेश्वर सावंत, प्रसुती शिवप्रसाद मेस्त्री, नारद - चारुहास मांजरेकर, अंगीराऋषी - सागर गावकर, दधिची ऋषी गौरव शिर्के, तारकासूर - प्रशांत मयेकर, उदय मोर्ये, मायावीकृत्या- जटा - महेंद्र सुयश ठाकुर, सदभिष कुडव, सेवक संदेश वेंगुर्लेकर तसेच हार्मोनियम संकेत कुडव, पखवाज पियुष खांदारे, तालरक्षक विनायक सावंत यांची संगीतसाथ असणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
---------
‘अणसूर पाल’मध्ये
१ जुलैला कृषी दिन
वेंगुर्ले ः राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त १ जुलैला वेंगुर्ले पंचायत समितीतर्फे अणसूर पाल हायस्कूल येथे कृषी दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ल्याचे शास्त्रज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. शिवाय अणसूर-पाल हायस्कूलच्या आवारात हळद लागवड करण्यात येणार आहे. कार्यक्रमास उपस्थित राहवे, असे आवाहन वेंगुर्ले पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांनी केले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.