पुणे - कल्याणीनगरमधील 'पोर्श' अपघातानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी ससून रुग्णालयात अल्पवयीन आरोपीसह त्याच्या मित्रांचे रक्ताचे नमुने बदलण्यात आल्याचा पोलिसांचा आरोप आहे. या प्रकरणात पुणे सत्र न्यायालयात दहा आरोपींविरोधात आरोप निश्चितीची प्रक्रिया शुक्रवारपासून (ता. २७) सुरू झाली आहे. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी खटल्याची सखोल माहिती न्यायालयासमोर मांडली.
कल्याणीनगरमध्ये १८ मेच्या मध्यरात्री भरधाव ‘पोर्श’ मोटारीने दुचाकीला धडक दिल्याने तरुण-तरुणीचा मृत्यू झाला होता. या अपघातात अल्पवयीन मुलगा वाहन चालवत होता आणि त्याच्यासोबत दोन अल्पवयीन मित्र होते.
अपघातापूर्वी तिघांनी मुंढव्यातील दोन पबमध्ये मद्यपान केल्याची माहिती तपासात समोर आली होती. त्यानंतर त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आले. मात्र, हे नमुने बदलून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.
अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अगरवाल, आई शिवानी अगरवाल, अरुणकुमार सिंग यांनी अश्पाक मकानदार, अमर गायकवाड, आदित्य सूद, आशिष मित्तल यांच्याशी संगनमत करून ससून रुग्णालयातील शिपाई अतुल घटकांबळे याच्या मदतीने नमुने बदलल्याचा आरोप आहे.
या प्रकरणात न्यायवैद्यक विभागाचे तत्कालीन प्रमुख डॉ. अजय तावरे आणि आपत्कालीन विभागाचे तत्कालीन मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर यांचाही सहभाग असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
विशेष सरकारी वकील हिरे यांनी युक्तिवादादरम्यान साक्षीदारांचे जबाब, सीसीटीव्ही चित्रीकरण, कॉल डिटेल्स रेकॉर्ड, व्हॉट्सअॅप चॅट, डीएनए अहवाल, आरोपींची ओळख परेड, हस्ताक्षर तज्ज्ञांचे निष्कर्ष आणि जप्त करण्यात आलेली तीन लाख रुपयांची रोकड यांसारख्या तांत्रिक व दृक्श्राव्य पुराव्यांद्वारे आरोपींच्या सहभागाचे तपशील स्पष्ट केले.
याप्रकरणी बचाव पक्षाकडून दोन जुलै रोजी युक्तिवाद सादर केला जाणार आहे. त्यानंतर न्यायालय आरोपींविरोधात आरोप निश्चित करणार आहे. दरम्यान, आरोपी अश्पाक मकानदार याने दोषमुक्तीसाठी अर्ज केला आहे. तर आशिष मित्तल याने कागदपत्रांची मागणी करणारा स्वतंत्र अर्ज न्यायालयात दाखल केला आहे.
प्रमुख मुद्दे -
- अपघातानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी रक्त नमुने बदलल्याचा आरोप
- विशेष सरकारी वकिलांचा साडेचार तास युक्तिवाद
- तपासात उघडकीस आलेला विस्तृत कट, लाच, संगनमत आणि तांत्रिक पुरावे
- दोन जुलैला बचाव पक्ष मांडणार बाजू; त्यानंतर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय अपेक्षित.