तळेगाव स्टेशन, ता. २८ : ‘माझी वसुंधरा अभियान ६.०’ अंतर्गत पर्यावरण संवर्धन आणि हरित शहर निर्मितीच्या उद्देशाने राज्य शासनाच्या निर्देशानुसार तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या वतीने बांबू, खस आणि शेवगा या उपयुक्त देशी वृक्षप्रजातींच्या लागवडीसाठी नागरिक व विकासकांना आवाहन करण्यात आले आहे.
आरोग्यदायी गुणधर्म असलेली शेवगा ही एक औषधी वनस्पती असून तिच्या शेंगा, पाने, फुले आणि बिया यांचा विविध प्रकारे औषधी उपयोग होतो. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स व जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात असून ती शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. तसेच, रक्तातील साखरेची पातळी कमी करण्याचे गुणधर्मही असल्यामुळे मधुमेह नियंत्रणासाठी उपयुक्त ठरते.
या पार्श्वभूमीवर तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्यावतीने शेवगा प्रजातीची रोपे मोफत वाटप करण्यात येणार आहे. नागरिकांनी व विकासकांनी आपल्या परिसरात, सोसायट्या, प्लॉट, संस्था परिसरात ही रोपे लावून त्याचे योग्य संगोपन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ही मोहीम २ ते १० जुलै या कालावधीत राबविण्यात येणार असून, रोपे नगरपरिषद कार्यालयात मोफत वितरित केली जातील. रोप घेणाऱ्या प्रत्येकाने संगोपन हमीपत्र भरून देणे अनिवार्य आहे. हमीपत्र दिल्यानंतरच रोपे वितरित केली जातील. उपलब्ध रोपे मर्यादित असल्यामुळे ‘पहिले येणाऱ्यास प्राधान्य''’ या तत्त्वानुसार वाटप करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्याधिकारी ममता राठोड यांनी दिली.
पर्यावरण संरक्षण ही सामाजिक व नैतिक जबाबदारी आहे. यामध्ये प्रत्येक नागरिकाचा सक्रिय सहभाग आवश्यक असून, सर्वांनी मिळून ‘हरित तळेगाव’ साकारण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी केले आहे.