अंडर19 मेन्स नंतर सिनिअर वूमन्स टीम इंडियाने सांगलीकर स्मृती मंधाना हीच्या नेतृत्वात इंग्लंड दौऱ्याची सुरुवात विजयाने करण्यात यश मिळवलं आहे. वूमन्स टीम इंडियाने इंग्लंडचा पहिल्या टी 20I सामन्यात धुव्वा उडवला आहे. टीम इंडियाने यजमान संघावर 97 धावांच्या फरकाने एकतर्फी विजय मिळवला आहे. टीम इंडियाने या विजयासह 5 सामन्यांच्या या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. उपकर्णधार स्मृती मंधाना आणि श्री चरणी या दोघींनी टीम इंडियाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली.
ओपनर स्मृती मंधाना हीने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने इंग्लंडसमोर 211 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र श्री चरणी हीने घेतलेल्या सर्वाधिक 4 विकेट्समुळे इंग्लंडला संपूर्ण 20 ओव्हरही खेळता आलं नाही. श्री आणि इतर गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर भारताने इंग्लंडला 14.5 ओव्हरमध्ये 113 रन्सवर गुंडाळलं आणि पहिला विजय नोंदवला.
इंग्लंडसाठी कॅप्टन नॅट सायव्हर ब्रँट हीने अर्धशतकी खेळी केली. त्यामुळे इंग्लंडला कसंतरी 100 पार पोहचता आलं. ब्रँटने 42 बॉलमध्ये 10 फोरसह 66 रन्स केल्या. तर या व्यतिरिक्त इतर सर्व इंग्लंडच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. इंग्लंडसाठी कॅप्टन व्यतिरिक्त दोघींनाच दुहेरी आकडा गाठता आला. मात्र त्यांना 15 धावांच्या आतच मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर इतरांनी भारतीय गोलंदाजांसमोर सरेंडर केलं. श्री चरणी हीने 3.5 ओव्हरमध्ये अवघ्या 12 रन्स देत 4 विकेट्स मिळवल्या. दीप्ती शर्मा हीने दोघींना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर अमनज्योत कौर आणि अरुंधती रेड्डी या जोडीने 1-1 विकेट मिळवली.