नाशिक- शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशासाठी राबविलेल्या पहिल्या फेरीची निवड यादी शनिवारी (ता. २८) सायंकाळी उशिरा शिक्षण विभागाने जाहीर केली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशनिश्चितीसाठी ७ जुलैपर्यंत मुदत असेल. आरवायके महाविद्यालयासाठी विज्ञान शाखेचा ९२ टक्के, ‘बीवायके’मध्ये वाणिज्य शाखेचा कट-ऑफ ९२.२ टक्के आहे.
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन केंद्रीभूत प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे. प्रवेश नोंदणीच्या कालावधीपासून अस्थिरता व गोंधळाची स्थिती पाहायला मिळते. यापूर्वीच्या वेळापत्रकानुसार गुरुवारी (ता. २६) यादी जाहीर होणार होती. परंतु, ऐन वेळी तांत्रिक अडचणी व न्यायायीन प्रक्रियेचे कारण देताना वेळापत्रकात ऐन वेळी बदल जाहीर केला होता. सोमवारी (ता. ३०) पहिल्या फेरीची निवड यादी जाहीर केली जाईल, असेही जाहीर केले होते; परंतु अचानक शनिवारी (ता. २८) निवड यादी प्रसिद्ध करताना शिक्षण विभागाने विद्यार्थी, पालकांना सुखद धक्का दिला.
पहिल्या फेरीत नाशिक जिल्ह्यातून ६० हजार ६८१ विद्यार्थ्यांनी, तर नाशिकसह जळगाव, धुळे, नंदुरबारचा समावेश असलेल्या नाशिक विभागातून एक लाख ३० हजार ९७२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. तत्पूर्वी राबविलेल्या शून्य फेरीतून कोट्यांच्या जागांसाठी प्रवेशप्रक्रिया राबविली होती. मात्र, त्यास अतिशय अल्प प्रतिसाद मिळाल्याने नियमित प्रवेशफेऱ्यांबरोबर कोट्याच्या जागांच्या प्रवेशाची प्रक्रिया राबविण्याचा निर्णय शिक्षण विभागाला घ्यावा लागला आहे.
विज्ञान शाखेत प्रवेशासाठी चुरस
शहरी भागातील मोठ्या महाविद्यालयांमध्ये, तसेच ग्रामीण भागात तालुका पातळीवर असलेल्या महाविद्यालयांमध्ये विज्ञान शाखेचा अनुदानित जागांसाठीचा कट-ऑफ नव्वदीपार राहिला आहे. नाशिक शहरातील आरवायके महाविद्यालयाचा खुल्या गटाचा अनुदानित जागेसाठीचा कट-ऑफ ९२ टक्के, तर ‘केटीएचएम’चा ९०.८ टक्के, लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयाचा ८६.४ टक्के, भोसला महाविद्यालयाचा ८९.२ टक्के, व्ही. एन. नाईक महाविद्यालयात विनाअनुदानित विज्ञान शाखेसाठी ८६.६ टक्के इतका खुल्या गटासाठीचा कट ऑफ राहिला आहे.
Dada Bhuse : ‘हिंदी सक्ती’ वादावर दादा भुसे यांचे स्पष्टीकरण; पत्रकार परिषदेत खुलासाबीवायके महाविद्यालयात वाणिज्य शाखा खुला गट अनुदानित जागेसाठी ९२.२ टक्के कट ऑफ राहिला. कला शाखेच्या प्रवेशासाठी ‘एचपीटी’मध्ये खुला गट अनुदानित जागेसाठी ८०.८ टक्यांचा कट-ऑफ लागला आहे. इतर बहुतांश महाविद्यालयांत कला शाखेला सहज प्रवेश उपलब्ध आहे.