74203
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत आजपासून ‘एआय’
मनीष दळवी ः वर्धापन दिन, कृषी दिनी होणार तंत्रज्ञानाचे लोकार्पण
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ३० ः सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा उद्या (ता. १) ४२ वा वर्धापन दिन आहे. तसेच याच दिवशी कृषिदिन आहे. या निमित्ताने याच दिवशी जिल्हा बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन केले आहे. राज्यातील जिल्हा बँकांत आर्थिक वर्ष संपल्यानंतर एवढ्या कमी कालावधीत वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करणारी सिंधुदुर्ग जिल्हा बँक पहिली ठरली आहे. तसेच याचे औचित्य साधून ‘एआय’ या तंत्रज्ञानाचा प्रारंभ करण्यात येत असून ‘एआय’ वापरणारी जिल्हा बँक राज्यात पहिलीच ठरणार आहे, अशी माहिती जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी दिली.
सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत अध्यक्ष दळवी बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, संचालक दिलीप रावराणे, विठ्ठल देसाई, महेश सारंग आदी उपस्थित होते. श्री. दळवी म्हणाले, ‘१ जुलै हा दिवस कृषी दिन साजरा केला जात असल्याने राज्यात उद्यापासून सहकार सप्ताह सुरू होत आहे. त्यामुळे जिल्हा बँकांच्या सर्व शाखांतर्फे वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात येणार आहे. तसेच विविध विकास संस्थांच्या माध्यमातून हा कार्यक्रम साजरा करण्यात येणार आहे. उद्या
सिंधुदुर्गनगरी येथील पत्रकार भवन येथे सकाळी १०.३० वाजता वर्धापन दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील दहावी, बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच ठेवीदार ग्राहकांसाठी वरद विशेष मुदतठेव योजनेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. जिल्हा बँकेने जिल्ह्यातील सहकारी संस्थांचा विकास करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यात १३० सहकारी बँकांचे दैनंदिन व्यवहार ऑनलाईन सुरू झाले आहेत. या संस्था पूर्णतः संगणकीकृत झाल्या आहेत. आता या बँकांचा रोजचा व्यवहार जिल्हा बँक, नाबार्ड आणि शासन ऑनलाईन पाहू शकते. त्यामुळे या संस्थांचे चेअरमन आणि सचिव यांचा सत्कार यावेळी केला जाणार आहे. हा कार्यक्रम जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांच्या उपस्थितीत होणार आहे.’’
श्री. दळवी म्हणाले, ‘‘जिल्हा बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा यापूर्वी ऑगस्ट महिन्यात किंवा त्यानंतर होत होती. कारण मागील वर्षाचे ऑडिट पूर्ण करणे बंधनकारक असते. मात्र, जिल्हा बँकेने या वर्षीपासून १ जुलैला बँकेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार उद्या दुपारी २ वाजता शरद कृषी भवन येथे सभा होत आहे. आर्थिक वर्ष संपल्यानंतर तीन महिन्यांत वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करणे कठीण काम आहे. मात्र, ते शक्य केल्याने सिंधुदुर्ग जिल्हा बँक एवढ्या कमी कालावधीत वार्षिक सभा आयोजित करणारी राज्यातील पहिली बँक ठरली आहे. जिल्हा बँक आता एआय प्रणाली स्वीकारत आहे. त्यामुळे त्याचा प्रारंभही यावेळी केला जाणार आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करणारी राज्यातील पहिली जिल्हा बँक ठरल्याचा मानही यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला मिळणार आहे. या सभेला सभासदांनी शरद कृषी भवन येथे उपस्थित राहावे.’’
-----
डोअर स्टेप बँकिंगचाही फायदा
जिल्हा बँकेने वर्षभरापूर्वी डोअर स्टेप बँकिंग सुरू केले आहे. याचा जिल्ह्यातील हजारो ज्येष्ठ नागरिकांना फायदा झाला आहे. यामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बँकेच्या प्रतिनिधींचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच जिल्हा बँक कर्मचाऱ्यांना ड्रेसकोड निश्चित केला आहे. त्याचाही प्रारंभ वर्धापनदिन कार्यक्रमात करण्यात येणार आहे, असे यावेळी अध्यक्ष दळवी यांनी सांगितले.